gadchandur crime news police station investigation

गडचांदूर हादरले! सोबत जेवल्या अन् रात्रीच मैत्रीचा केला घात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 14, 2026

गडचांदूर – gadchandur crime news अंतर्गत गडचांदूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोबत जेवण करून रात्री एकाच खोलीत झोपलेल्या मैत्रिणींनीच तरुणीचा घात केला. आरोपी महिलांनी तरुणीला बेदम मारहाण करत तिचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटले आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (हे हि वाचा – मूल शहरातील बंद घरात घरफोडी)

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता नंदू कन्नाके (वय २९, रा. गडचांदूर, मूळ रा. ठाकरे हॉस्पिटलजवळ, बोबडे यांचे घर) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संगीता यांची मैत्रीण कुंदा गणपत दिवे ही देखील गडचांदूर येथे भाड्याच्या खोलीत राहून मजुरीचे काम करते. १२ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास संगीता, कुंदा दिवे, तिची मैत्रीण संध्या मोहरेवार (रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) आणि संध्याचा एक पुरुष मित्र, असे चौघे मिळून लकडकोट येथील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. सायंकाळी ६ वाजता जेवण आटोपून हे सर्वजण गडचांदूर येथील खोलीवर परत आले. संध्या आणि तिचा मित्र रात्र झाल्यामुळे त्याच खोलीवर थांबले आणि रात्री १० वाजता सर्वजण झोपी गेले.

पायातील जोडवे अन् चाळ काढताना पकडले

रात्रीच्या वेळी संगीता यांना त्यांच्या उजव्या पायावर काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव झाली. त्यांनी उठून पाहिले असता कुंदा दिवे ही त्यांच्या पायातील चांदीचे जोडवे आणि साखळी (चाळ) काढताना दिसून आली. तसेच बाजूला संध्या आणि तिचा मित्र उभे होते. संगीता यांनी “तू माझे जोडवे आणि चाळ का काढत आहेस?” असा जाब विचारला असता, “तू गप्प राहा” असे म्हणत कुंदाने त्यांच्या गालावर दोन थापड मारल्या. त्यानंतर कुंदा दिवे आणि संध्या मोहरेवार यांनी संगीता यांचे केस पकडून त्यांचे डोके थेट भिंतीवर आपटले.

एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी संगीता यांच्या कानातील सोन्याच्या बिऱ्या जबरदस्तीने उपटून काढल्या. संगीता यांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला असता, दोन्ही महिलांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत संगीता यांच्या कपाळावर जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. आरोपी आपल्याला जिवे मारतील या भीतीने संगीता यांनी प्रसंगावधान राखत आरोपींच्या तावडीतून स्वतःची सोडवणूक केली आणि घरातून बाहेर पळ काढला.

घटनेनंतर पीडित संगीता कन्नाके यांनी थेट गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कुंदा गणपत दिवे आणि संध्या मोहरेवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०९(६) (जबरदस्तीने चोरी व मारहाण) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी भिमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राधिका रमेश गायकवाड या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment