भद्रावती: Bhadrawati Tobacco Police Action मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी शास्त्रीनगर आणि बेलगाव खोकरी फाटा येथे दोन स्वतंत्र छापे टाकले.
या धडक कारवाईत ९१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ठाणेदार सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. (हे हि वाचा – दारुड्याने पोलिसांना केली शिवीगाळ, गुन्हा दाखल)
Bhadrawati Tobacco Police Action : दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास घातक असल्यामुळे बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू व खऱ्याच्या अवैध साठा आणि वाहतुकीविरोधात भद्रावती पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. रविवारी, १३ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी भद्रावती शहरातील शास्त्रीनगर आणि मौजा बेलगाव खोकरी फाटा अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र छापे टाकून सुमारे ९१ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एकूण तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शास्त्रीनगर येथील घरातून मजा १०८ तंबाखूचा साठा जप्त
पहिली कारवाई भद्रावती शहरातील शास्त्रीनगर परिसरात करण्यात आली. येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर मजा सुगंधित तंबाखूचा साठा करून खर्रा घोटून विक्री केला जात असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बेसरकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह शास्त्रीनगर येथील प्रशिक हिरामन चहांदे याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तेथे रितीक सुधाकर कांबळे (वय २७, रा. सुरक्षानगर, भद्रावती) हा इसम प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून खर्रा घोटताना रंगेहात मिळून आला.
घराची झडती घेतली असता पोलिसांना ९ हजार १२० रुपये किमतीचे मजा १०८ कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे ३२ सीलबंद डब्बे, ५३० रुपयांची कातरलेली सुपारी, २ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० खर्रा पुड्या, खर्रा विक्रीचे १ हजार ६७० रुपये रोख आणि घोटण्यासाठी लागणारे रबरी तुकडे असा एकूण १४ हजार २२० रुपयांचा माल मिळून आला. आरोपी रितीक कांबळे याने हा माल प्रशिक चहांदे याचा असून आपण त्याच्याकडे मजुरीने खर्रा घोटण्याचे काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९१९/२०२६ अन्वये रितीक कांबळे व पाहिजे असलेला मुख्य आरोपी प्रशिक चहांदे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेलगाव खोकरी फाट्यावर नाकाबंदीत दुचाकीसह तंबाखू जप्त
दरम्यान, या कारवाईनंतर काही वेळातच पोलिसांना दुसरी महत्त्वपूर्ण गुप्त माहिती मिळाली की, वरोरा येथून एका दुचाकीवरून मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक मौजा बेलगाव येथे केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा बेलगाव खोकरी फाट्यावर तात्काळ नाकाबंदी लावली. त्यावेळी काळ्या रंगाच्या हिरो पॅशन प्रो मोटारसायकलवरून (क्र. MH-34-AZ-3226) पेट्रोल टाकीवर पांढऱ्या रंगाची चुंगडी ठेवून येणाऱ्या संशयिताला पोलिसांनी थांबवले. विचारपूस केली असता त्याने आपले नाव अमोल शालीक वाभीतकर (वय ३५, धंदा पानठेला, रा. बेलगाव, ता. भद्रावती) असे सांगितले.
त्याच्याकडील चुंगडीची पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात ११ हजार ६२० रुपये किमतीचे ईगल हुक्का शिशा कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे २०० ग्रॅम वजनाचे २८ सीलबंद पाकिटे आणि ५ हजार ३०० रुपयांची १० किलो कातरलेली सुपारी आढळून आली. पोलिसांनी सुगंधित तंबाखू, सुपारी आणि वाहतुकीसाठी वापरलेली ६० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ७६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला. याप्रकरणी आरोपी अमोल वाभीतकर याच्याविरुद्ध पोलीस ठाणे भद्रावती येथे अपराध क्रमांक ९२०/२०२६ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही धडक कामगिरी ठाणेदार सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बेसरकर, पोलीस अंमलदार योगेश, संतोष आणि खुशाल यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस हवालदार देवानंद डुकरे करत आहेत. बंदी असलेल्या घातक सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा सक्त इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






