MCOCA Against Drug Peddlers Chandrapur police action on gang

२१ गुन्हे दाखल असलेल्या टोळीवर मोक्का; चंद्रपूर पोलिसांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 5, 2026

चंद्रपूर: MCOCA Against Drug Peddlers ही कठोर कायदेशीर मोहीम चंद्रपूर पोलीस दलाने जिल्ह्यात प्रथमच राबवून इतिहास घडवला आहे. शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या सराईत टोळीवर पहिल्यांदाच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असलेल्या चार सराईत गुन्हेगारांवर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर अमली पदार्थांसह शरीराविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरात ५ किलो गांजा जप्त)

भविष्यात कोणीही पुन्हा अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्यास त्याच्यावरही अशीच थेट कारवाई केली जाईल असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.

MCOCA Against Drug Peddlers: चंद्रपूर पोलिसांचा ऐतिहासिक दणका

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे पसरवून तरुण पिढीला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय राहणाऱ्या सराईत टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलीस दलाने आतापर्यंतचे सर्वात कठोर व ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच थेट अमली पदार्थ (ड्रग्ज) विकणाऱ्या टोळीविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९’ म्हणजेच ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत दणकेबाज कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईद्वारे पोलिसांनी गुन्हेगारी जगताला एक अत्यंत कडक आणि स्पष्ट इशारा दिला असून यापुढे जिल्ह्यात कोणीही अमली पदार्थांची तस्करी करण्याचे धाडस केले, तर त्याच्याविरुद्धही थेट मोक्काचाच बडगा उगारून त्याचे अस्तित्व संपवले जाईल, हा सज्जड दम या कारवाईतून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांवर पहिल्यांदाच मोक्काची कारवाई

रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ९८०/२०२६ कलम ८ (क), २० (b) (ii) (b), २९ एन.डी.पी.एस. अ‍ॅक्टनुसार अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात बगड खिडकी नुरी चौक येथील वसीमखान आरिफखान उर्फ कालू (वय ४० वर्ष), नसीबखान आरिफखान उर्फ मालू (वय ३९ वर्ष), जुबेर करिम खान (सर्व रा. बगड खिडकी, चंद्रपूर) तसेच अन्य एका पाहिजे असलेल्या आरोपीचा समावेश आहे. तपासादरम्यान समोर आले की, या आरोपींविरुद्ध केवळ अमली पदार्थांची तस्करीच नव्हे, तर हिंसक मारामारी आणि शरीराविरुद्धचे तब्बल २१ गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असून ते सर्व पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. ही टोळी शहरात दहशत निर्माण करून संघटितपणे गुन्हेगारी साम्राज्य चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी आणि या टोळीचे संघटित नेटवर्क समूळ नष्ट करण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे या तस्करांवर मोक्का लावण्याचा सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यास तात्काळ मंजुरी दिली. त्यानुसार ४ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व आरोपींविरुद्ध मोक्काची कलमे वाढवून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

सदर उल्लेखनीय व ऐतिहासिक कामगिरी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व त्यांच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली. अमली पदार्थांच्या तस्करांवर थेट मोक्काचा बडगा उगारल्याने ड्रग्ज माफियांचे धाबे पुरते दणाणले असून, चंद्रपुरात पुन्हा कोणी अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात पाऊल ठेवल्यास त्याला थेट तुरुंगात खितपत पाडणाऱ्या मोक्का कारवाईलाच सामोरे जावे लागेल, असा जरब निर्माण करणारा संदेश पोलिसांनी दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment