भद्रावती : Bhadrawati Crime News अंतर्गत भद्रावती पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. सायवन हायवे रोडवर पोलिसांनी फिल्मी स्टाईल नाकाबंदी रचली. यावेळी एका महिलेकडून २ किलो २६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. यासोबतच मोपेड आणि ॲपल आयफोन असा १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली. (हे हि वाचा – चंद्रपुरात ड्रग माफियांवर मोक्का)
Bhadrawati Crime News: सायवन हायवेवर पोलिसांची धडक कारवाई
चंद्रपूरवरून भद्रावतीच्या दिशेने मोपेडवरून बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका महिला तस्कराला भद्रावती पोलिसांनी सायवन हायवेवर फिल्मी स्टाईल नाकाबंदी करून बेड्या ठोकल्या. ५ सप्टेंबर रोजी भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर पाळत ठेवली जात असताना, चंद्रपूरकडून भद्रावतीकडे एका हिरव्या रंगाच्या सुझुकी मोपेडवरून एक महिला अमली पदार्थांची खेप घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांनी तातडीने सायवन हायवे रोडवर पोलीस पथकासह सापळा रचून नाकाबंदी केली.
महिला गांजा तस्कराकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
संशयित हिरव्या रंगाची मोपेड सायवन रोडवर येताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तिला अडवले. पोलिसांनी वाहनाची व संशयित महिलेची झडती घेतली असता तिच्या ताब्यातून दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गुंडाळलेला अनुक्रमे १ किलो १० ग्रॅम आणि १ किलो १६ ग्रॅम असा एकूण २ किलो २६ ग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे. याशिवाय पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किमतीची सुझुकी मोपेड (क्रमांक MH 34 CS 1752) आणि १५ हजार रुपये किमतीचा एक जुना निळ्या रंगाचा अॅपल आयफोन ११, असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८ (क), २० (ब)(II)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, ती हा गांजा कोठून आणत होती आणि भद्रावती परिसरामध्ये तो कोणाला पुरवणार होती याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
सदर धडक कामगिरी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन एस. खेत्रे यांच्या नेतृत्वात सपोनि. संजय मिश्रा, पोउपनि. संतोष केदार, सफौ. महेंद्र, पोलीस अंमलदार गोपाल, देवानंद, प्रशांत, अनुप, धर्मराज, योगेश, संतोष, खुशाल, किरण, नितीन तसेच महिला पोलीस अंमलदार रागिनी, पुजा, मोनाली व भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






