चंद्रपूर: Chandrapur Police Ganeshotsav Competition ची चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने घोषणा केली आहे. आगामी सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा हा यामागील हेतू आहे. सामाजिक प्रबोधन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी विहित नमुन्यात प्रवेशिका सादर करायची आहे. (हे हि वाचा – महाशिवलिंग जीर्णोद्धार सोहळा, अमृता फडणवीस चंद्रपुरात येणार)
Chandrapur Police Ganeshotsav Competition: पोलिसांचा अभिनव उपक्रम नेमका काय?
आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, तसेच समाजातील ज्वलंत विषयांवर जनजागृती घडून यावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उत्सवाचे पावित्र्य जपत असतानाच तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असून, यावर्षीच्या गणेशोत्सवात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि महिला सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रबोधनात्मक उपक्रम राबवणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
व्यसनमुक्ती आणि अमली पदार्थ विरोधी मोहिमेवर भर
पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत दिलेल्या माहितीनुसार गणेश मंडळांनी केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता समाजाला दिशा देणाऱ्या घटकांवर काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने व्यसनमुक्ती, ड्रग्जचे दुष्परिणाम आणि निरोगी समाज घडविण्याच्या दृष्टीने देखावे सादर करणाऱ्या, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत कर्णकर्कश डीजे किंवा साऊंड सिस्टीमचा वापर टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे विशेष मूल्यांकन केले जाईल. याव्यतिरिक्त महिलांवर होणारे अत्याचार रोखणे, छेडछाड विरोधी संदेश, सायबर सुरक्षितता आणि महिला कायदे या विषयांवर जिवंत देखावे, पथनाट्य अथवा जनजागृतीपर कार्यक्रम सादर करणाऱ्या तसेच मंडप परिसर, मिरवणूक व आरतीदरम्यान पोलीस प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तीन सार्वजनिक गणेश मंडळांची निवड पोलीस प्रशासनामार्फत गठित करण्यात आलेल्या विशेष समितीकडून केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्या मंडळांना चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना विहित नमुन्यातील प्रवेशिका भरणे आवश्यक असून, त्यामध्ये मंडळाचे नाव, नोंदणी क्रमांक, पत्ता, संपर्क व्यक्तीचा तपशील, निवडलेला विषय आणि देखाव्याचे संक्षिप्त वर्णन सादर करावे लागणार आहे. इच्छुक गणेश मंडळांनी आपली प्रवेशिका spchandrapur123@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 74477440100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस दलाने केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






