चंद्रपूर : Mahavitaran Ganeshotsav Power Guidelines जाहीर झाल्या आहेत. गणेशोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून महावितरणने मंडळांना सतर्क केले. मंडळांना तात्पुरत्या जोडणीसाठी घरगुती दराने वीज उपलब्ध होणार आहे. सर्व मंडळांनी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
Mahavitaran Ganeshotsav Power Guidelines: अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशरायांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या आनंदात कुठलेही विघ्न येऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वीज जोडणी घेणे महत्त्वाचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात भाजपची एसआयआर कार्यशाळा उत्साहात)
गणेशोत्सव मंडळांसाठी घरगुती दराने तात्पुरती वीज उपलब्ध
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित केले आहे. सार्वजनिक उत्सव आनंददायी आणि सुरक्षित करण्यासाठी, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दराचे वीजदर निश्चित केले आहेत. यामुळे मंडळांनी अनधिकृत जोडण्या टाळाव्यात आणि अधिकृत वीजपुरवठा घ्यावा, जेणेकरून संभाव्य अपघातांचा धोका टाळता येईल. मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था केवळ अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्याची सूचनाही महावितरणने दिली आहे.
रोषणाई आणि देखाव्यांसाठी वीज सुरक्षेची महत्त्वाची खबरदारी
सुरक्षित उत्सवासाठी काही महत्त्वाची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. यामध्ये रोषणाई आणि देखावे उभारताना परिसरातील वीज वाहिन्या, खांब किंवा वितरण रोहित्रांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घ्यावा, ज्यामुळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होऊन होणारे अपघात टाळता येतात. जवळच्या वीज खांबांवर किंवा वाहिन्यांवर ‘हुक’ टाकून वीज घेणे टाळावे, कारण यामुळे जीवित आणि वित्तहानीचा मोठा धोका असतो. वीज जोडणीसाठी वापरण्यात येणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खात्री करून जुनी किंवा तुटलेली तार वापरू नये. तसेच सर्व विद्युत उपकरणांचे योग्य अर्थिंग असल्याची खात्री करून वेळोवेळी त्याची चाचणी घ्यावी आणि एकाच मल्टी प्लगवर अनेक उपकरणे जोडणे टाळावे.
मंडळांच्या सोयीसाठी महावितरण आपल्या सर्व कार्यालयांतून विशेष शिबिरे आयोजित करत असून या शिबिरात मंडळांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे. या जोडणीसाठी मंडळांना नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी, पोलीस परवाना आणि विद्युत निरीक्षकांचे प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करावी लागतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तात्पुरत्या जोडणीसाठी भरलेली अनामत रक्कम मंडळांना विनाविलंब परत मिळणार आहे. मंडळांनी ही रक्कम ऑनलाइन भरल्यास, गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम लगेच परत दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी मंडळांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912, 19120, 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय, संबंधित भागातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावेत. बाप्पाचा उत्सव साजरा करताना सुरक्षेला प्राधान्य देऊन एका जबाबदार मंडळाची ओळख निर्माण करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






