brahmapuri illegal moneylending case

सावकारी त्रासाविरुद्ध थेट तक्रार, कोरे चेक आणि ११ डायऱ्यां जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 18, 2026

ब्रम्हपुरी : (brahmapuri illegal moneylending case) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. शासकीय परवान्याशिवाय बेकायदेशीर सावकारी करत कर्जदारांना धमकावणाऱ्या एका ५८ वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अमरसिंग लक्ष्मणसिंग टाक असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सावकाराचे नाव आहे. सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीच्या घरावर थेट छापा टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कोरे चेक जप्त केले आहेत. (जुगार अड्ड्यावर छापा ९ जण ताब्यात)

brahmapuri illegal moneylending case : फुलेनगर मधील घरात पोलिसांचा छापा

या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याकडून सहाय्यक निबंधक कार्यालयाला पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार, आरोपी अमरसिंग टाक हा अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. या पत्रासोबत रमेश गंगाधर बोबडे आणि सौ. पुजा धम्मदिप हुमने या दोन पीडित अर्जदारांचे तक्रार अर्ज जोडण्यात आले होते. या अर्जांच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक कार्यालयाने दोन्ही अर्जदारांना कार्यालयात बोलावून त्यांची सखोल चौकशी केली आणि त्यांच्याकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वयंघोषणापत्र लिहून घेतले. यामध्ये पहिल्या प्रकरणात व्यावसायिक रमेश बोबडे यांनी नमूद केले की, त्यांनी गृहउपयोगी वस्तूंच्या व्यवसायासाठी जानेवारी २०२६ मध्ये अमरसिंग टाक यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये रोख स्वरूपात व्याजाने घेतले होते.

हे पैसे प्रतिदिन २,७५० रुपये प्रमाणे ६० दिवसांत परत करण्याचे ठरले होते. बोबडे यांनी आजवर ६५,५५० रुपये परत केले असतानाही, आरोपी मूळ रकमेसह संपूर्ण पैशांसाठी त्यांच्यावर दबाव आणत होता, तसेच पैशांच्या वसुलीसाठी शिवीगाळ व धमकी देत होता. दुसऱ्या प्रकरणात सौ. पुजा हुमने यांनी मुलाच्या आजारपणासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपीकडून ३० हजार रुपये ऑनलाइन घेतले होते. त्यांनी आजवर ३१ हजार रुपये परत केले असतानाही, आरोपी त्यांच्यावर अजून ७२ हजार रुपये बाकी असल्याचे सांगत मानसिक त्रास देऊन धमकावत होता.

या दोन्ही गंभीर तक्रारींची दखल घेत सहाय्यक निबंधक स्वप्नील पाटील यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या कलम १६ नुसार कायदेशीर कारवाईसाठी एक विशेष पथक नियुक्त केले. या पथकाने पंचांसमक्ष आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात १४ जुलै २०२६ रोजी आरोपी अमरसिंग टाक याच्या फुलेनगर येथील घरावर छापा टाकला. या घरझडती दरम्यान पथकाला अवैध सावकारी व्यवसायाशी संबंधित अनेक आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले. यामध्ये लोकांना व्याजाने पैसे दिल्याचा लेखाजोखा असलेल्या एकूण ११ नोंदवह्या, कर्जदारांच्या दैनंदिन वसुलीची नोंद ठेवण्यासाठी वापरली जाणारी एक नोंद असलेली व एक कोरी लहान पासबुक, तसेच वेगवेगळ्या नोंदवह्यांमध्ये लपवून ठेवलेले ०६ स्वाक्षरी केलेले कोरे चेक जप्त करण्यात आले.

या चेकमध्ये कोणतीही रक्कम किंवा तारीख नमूद केलेली नव्हती. जप्त करण्यात आलेली ही सर्व कागदपत्रे आणि अभिलेख पाहता, आरोपी वैध परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून १७ जुलै २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज दादाराव खडसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment