Bhadravati Cockfight Raid भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई

कोंबड्यांच्या झुंजीवर सुरु होता जुगार, ५ कोंबड्यांसह चौघांना पकडले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 27, 2026

भद्रावती: Bhadravati Cockfight Raid: भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा सुमठाना शेतशिवारात पोलिसांनी बेकायदेशीर कोंबड्यांच्या झुंजीवर धडक छापा टाकला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ कोंबडे आणि रोख रक्कमेसह एकूण ३,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – शेतशिवारात सुरु होता जुगार, पोलिसांनी मारली धाड)

दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी भद्रावती पोलिसांना मौजा सुमठाना येथील शेतशिवारात काही इसम कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती (मुखबीरद्वारे) मिळाली होती. माहितीची खात्री पटताच पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा यांच्यासह पोलीस पथकाने दोन पंचासमक्ष घटनास्थळावर लपत-छपत धाड टाकली. पोलिसांना पाहताच तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच धावपळ उडाली आणि काही जण हातातील कोंबडे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून चार जणांना जागीच पकडले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश मनोहर फटाले (वय ३६, रा. श्रीनगर विजासन रोड, भद्रावती), राजा मोठी शेट्टी (वय ३९, रा. मोहबाळा, भद्रावती), अतुल ज्ञानेश्वर पिंपळकर (वय ३१, रा. मासळ, भद्रावती) आणि अशोक शंकर कावळे (वय ६५, रा. दाताळा, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण १,९६० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून २ जखमी आणि ३ जिवंत असे एकूण ५ कोंबडे हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी सर्व कोंबड्यांचा पोलीस ठाण्यात लिलाव केला असता त्यातून १,५०० रुपये प्राप्त झाले. अशा प्रकारे नगदी १,९६० रुपये आणि लिलावाची रक्कम १,५०० रुपये असा एकूण ३,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील कलमे ही सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची असल्याने आरोपींना अटकेऐवजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सूचनापत्र देऊन सोडण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार धनंजय काळे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment