आरवट कोंबड्यांची झुंज जुगारावर कारवाई करणारे चंद्रपूर शहर पोलीस

कोंबड्याच्या झुंजीवर सुरु होता जुगार, चंद्रपूर पोलिसांची छापेमारी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

चंद्रपूर: आरवट कोंबड्यांची झुंज – चंद्रपूर शहरापासून सुमारे पाच किलोमीटरवरील आरवट येथे सुरू असलेल्या कोंबड्यांची झुंज जुगारावर पोलिसांनी रविवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी छापा टाकला. नवीन वस्तीतील खुल्या जागेत झुंजीवर पैशांची बाजी लावली जात होती. चंद्रपूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब) अन्वये गुन्हा नोंदवला. दुचाकी, रोख रक्कम आणि कोंबड्यांसह ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरवट कोंबड्यांची झुंज: पोलिसांना कशी मिळाली माहिती?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जावेद रियाजुद्दीन सिद्दिकी हे आपल्या सहकाऱ्यांसह रविवारी दुपारी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस हवालदार संजय धोटे, पोलीस हवालदार संतोष दंडेवार, पोलीस अंमलदार खंडेराव माने आणि महिला पोलीस अंमलदार दीपिका झिंगरे यांचा समावेश होता.

गस्तीदरम्यान त्यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की आरवट येथील नवीन वस्तीतील खुल्या जागेत काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून हारजीतचा जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी आरवट नवीन वस्तीतील मधुकर नानाजी उलमाले (वय ५०, रा. नवीन वस्ती, आरवट) आणि विठ्ठल शंकर मिलमिले (वय ६५, रा. नवीन वस्ती, आरवट) या दोघांना पंच म्हणून पाचारण केले. त्यांना घटनेची माहिती देऊन लेखी सूचनापत्र बजावण्यात आले आणि पंच म्हणून सोबत घेतले. (पडक्या घरात सुरु होता जुगार, पोलिसांची छापेमारी, वाचा बातमी)

त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांनी आरवट नवीन वस्तीतील त्या खुल्या जागेकडे धाव घेतली. तिथे काही नागरिक जमा होऊन कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावत जुगार खेळताना आढळून आले. ही बाब पंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी लपतछपत जात अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण हातातील कोंबडे घेऊन शेतीच्या शिवारातून पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र काही जण घटनास्थळीच पोलिसांच्या तावडीत सापडले. पंचांच्या समक्ष पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची ओळख विचारून चौकशी केली असता त्यांची नावे प्रवीण मधुकर चरकुरवार (वय ३७, रा. पठाणपुरा वॉर्ड, चंद्रपूर), आकाश हेमराज खरतड (वय ३१, रा. पठाणपुरा वॉर्ड, चंद्रपूर) आणि निखील सुधाकर उलमाले (वय २८, रा. नवीन वस्ती, आरवट, चंद्रपूर) अशी स्पष्ट झाली.

कारवाईदरम्यान पंचांच्या उपस्थितीत आरोपींची अंगझडती आणि घटनास्थळाची झडती घेण्यात आली. त्यामध्ये प्रवीण चरकुरवार याच्या अंगझडतीत जुगारात जिंकलेले २०० रुपये, आकाश खरतड याच्या अंगझडतीत ३०० रुपये आणि निखील उलमाले याच्याकडून १०० रुपये रोख मिळून आले. तसेच घटनास्थळावरून अंदाजे ५० हजार रुपये किमतीची जुनी वापरती सुझुकी जिक्सर मोटारसायकल (क्र. एमएच ३४ सीएम ८०८३) आणि दोन कोंबडे आढळून आले. या दोन कोंबड्यांचा लिलाव करून प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ६०० रुपये प्राप्त करण्यात आले. अशा प्रकारे रोख रक्कम, मोटारसायकल आणि कोंबड्यांच्या लिलावाची रक्कम मिळून एकूण ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी पोलीस हवालदार जावेद रियाजुद्दीन सिद्दिकी यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून रात्री ६ वाजून ५१ मिनिटांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपती तुकाराम वाढई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “कोंबड्याच्या झुंजीवर सुरु होता जुगार, चंद्रपूर पोलिसांची छापेमारी”

Leave a Comment