ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी कोंबड्यांची झुंज प्रकरणी पोलिसांनी बरडकिन्ही जंगलशिवारात जुगार खेळणाऱ्या पाच जणांना रंगेहाथ अटक केली आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १ लाख ६९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात मोबाईल, रोकड, दोन दुचाकी आणि लोखंडी कात्यांचा समावेश आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. (अल्पवयीन मुलाने केली १ लाखांची चोरी, वाचा हि बातमी)
तालुक्यातील बरडकिन्ही येथील जंगलशिवारात बेकायदेशीरपणे पक्षांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगाराचा खेळ मांडणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत १ लाख ६९ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रम्हपुरी कोंबड्यांची झुंज: गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल लोनबले हे सहकारी कर्मचारी पोलीस हवालदार रतन लेनगुरे आणि पोलीस शिपाई अभिषेक आगाशे यांच्यासह मेंडकी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. बरडकिन्ही ते चिचगाव जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलशिवारात काही इसम जखमी कोंबड्यांच्या पायाला कात्या बांधून त्यांच्या झुंजीवर पैशांची हारजीत लावत जुगार खेळत असल्याचे समजताच, पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची चमू जंगलशिवारात पोहोचताच तिथे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचही जणांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुणाल रूषीजी मेश्राम (वय ३७, रा. गांगलवाडी), अज्ञान विठोबा महाडोरे (वय ३२, रा. बरडकिन्ही), सुनील वासुदेव मेश्राम (वय ३२, रा. गांगलवाडी), गजानन विठोबा महाडोरे (वय ३५, रा. बरडकिन्ही) आणि सुधीर दामोधर शेंडे (वय ३७, रा. बरडकिन्ही) यांचा समावेश आहे.
१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल कोणता जप्त झाला?
घटनास्थळी पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपींच्या ताब्यातून ३२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल्स, २,६३० रुपयांची रोकड, ३० रुपयांच्या दोन लोखंडी कात्या, ८० हजार रुपयांची हिरो स्प्लेन्डर प्लस (MH 34 CS 6894) आणि ५५ हजार रुपयांची होंडा डिओ मोपेड (MH 34 BW 8944) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय आरोपींच्या ताब्यातून जखमी अवस्थेतील दोन झुंजार कोंबडेही ताब्यात घेण्यात आले. हे कोंबडे जखमी असल्याने पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष त्यांची जाहीर बोली लावून लिलाव करण्यात आला. या लिलावातून ३०० रुपये प्राप्त झाले, ज्याची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार अमोल अंबादास लोनबले (बकल नंबर १०१०) यांच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रतन लेनगुरे (बकल नंबर १६९) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






