बंगाली कॅम्प चौक अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता आणि वाहतूक कोंडी

बंगाली कॅम्प चौकात रोज रात्री मुख्य रस्ता ‘गायब’; प्रशासनाच्या डोळ्यासमोर दारुड्यांची जादू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 28, 2026

चंद्रपूर : बंगाली कॅम्प चौक अतिक्रमण प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील एक प्रमुख मार्ग रोज सायंकाळी धोकादायक बनतो. वाईन शॉप व बारसमोर जमणाऱ्या गर्दीमुळे ४० फुटांचा रस्ता अवघ्या १५ फुटांवर येतो, ज्यामुळे या अपघाताच्या ब्लॅकस्पॉटवर वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी प्रशासनाला २० हून अधिक निवेदने दिली, मात्र कारवाई न झाल्याने आता ते ठिय्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. (चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर गुन्हा दाखल, कारण काय? वाचा हि बातमी)

जिल्ह्यात अपघातात रोज माणसं मरतायत, रस्ते अरुंद होतायत आणि प्रशासन मात्र गाढ झोपेचं सोंग घेऊन बसलंय. चंद्रपूरच्या रस्त्यांवर वाढत्या वाहतुकीने नागरिकांना चालायलाही जागा उरलेली नाही आणि अपघातांचा आकडा दिवसेंदिवस फुगतच चाललाय. पण शहरात एक असाही चौक आहे, जिथे रोज सायंकाळी सहा वाजता एक अदृश्य जादू घडते — रस्ताच गायब होतो!

अपघाताचा ब्लॅकस्पॉट, तरीही प्रशासन गप्प

चंद्रपूर शहरातील गजबजलेला बंगाली कॅम्प चौक हा आता निव्वळ चौक राहिलेला नाही, तो एक मृत्यूचा सापळा बनलाय. या चौकात आजवर कित्येक निष्पाप नागरिकांचा जीव अपघातात गेलाय, तरीही प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानतंय. सायंकाळ होताच या रस्त्यावर एक विचित्र “जादू” घडते — रस्ता आक्रसतो, संकुचित होतो, आणि या जादूचे खरे जादूगार आहेत रस्त्यावर तळ ठोकणारे दारुडे.

४० फुटांचा रस्ता होतो अवघा १५ फूट!

मूल आणि बल्लारपूर तालुक्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर एक वाईन शॉप आणि बार थाटलेला आहे. सूर्य मावळला की या दुकानासमोर दारुड्यांची झुंबड उडते — इतकी की शहराला जोडणारा भव्य ४० फुटांचा रस्ता अवघ्या १५ फुटांवर येऊन आदळतो! याच चौकात अनेकांचे प्राण अपघातात गेलेले असतानाही, वाईन शॉप आणि बार चालकांनी आपली मुजोरी अजिबात सोडलेली नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून, रोज सायंकाळी हे “दारू विक्रेते” संपूर्ण रस्त्यावरच आपला अनधिकृत कब्जा प्रस्थापित करतात.

महिलांना चालणंही अशक्य, तरीही २० निवेदने कचऱ्यात

या दारुड्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांची अवस्था बिकट होते. भाजपचे जिल्हा महामंत्री मनोज पॉल यांनी या गंभीर अतिक्रमणाबाबत प्रशासनाला तब्बल २० हून अधिक निवेदने दिली — पण झोपेचं सोंग घेतलेल्या यंत्रणेला अजूनही जाग आलेली नाही. सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणारी ही गर्दी हळूहळू संपूर्ण रस्ता गिळंकृत करते आणि जड वाहने, बस, चारचाकी, दुचाकी — सगळ्यांनाच या “अदृश्य अडथळ्यातून” वाट काढण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.

मनपा कार्यालयाच्या दारातच दारूपार्टी!

कहर म्हणजे, वाईन शॉपमधून दारू विकत घेतल्यावर हे दारुडे लगतच्या मोकळ्या जागेत बसून उघड्यावर दारू ढोसतात. आणि सगळ्यात धक्कादायक बाब — हे सगळं घडतं ते चक्क चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक ३ च्या कार्यालयाच्या दारातच! बाटल्या आणि चकणा घेऊन प्रशासनाच्याच उंबरठ्यावर मौजमजा करणाऱ्या या दारुड्यांना रोखणारं इथे कुणीच नाही.

मनोज पॉल यांनी जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग, मनपा आणि वाहतूक नियंत्रण विभाग — या सगळ्यांचे दरवाजे ठोठावले. पण प्रत्येक ठिकाणाहून एकच उत्तर — “असमर्थता.” आता संतप्त झालेले मनोज पॉल थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून लवकरच ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

नागरिकांचा सवाल — अधिकारी घाबरतात की हात मिळवलेत?

वाईन शॉप आणि बार चालक प्रशासनाला जुमानतच नाहीत, हे आता उघड सत्य आहे. पण खरा प्रश्न आहे तो वेगळाच — प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी या मुजोर व्यावसायिकांवर कारवाई करायला घाबरतात, की यामागे काही “समझोता” आहे? हा प्रश्न आता खुद्द नागरिकच विचारू लागले आहेत, आणि प्रशासनाकडे या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment