चंद्रपूर : Chandrapur Dolby Sound Ban संदर्भात जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डॉल्बी, प्लाझ्मा व प्रेशरमिड साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला. हा आदेश १ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. (रघुवंशी आग प्रकरण, २२ आस्थापनांना मनपाची नोटीस)
हा आदेश दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 24 वाजेपासून दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात लागू राहणार आहे. जिल्ह्यात या कालावधीत गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, दुर्गामूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकांसह विविध उत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांदरम्यान काही ठिकाणी डॉल्बी साऊंडच्या टॉप, मिड व बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टिमचे थरावर थर चढवून भिंतीसारखी रचना उभारण्यासाठी वाहनांमध्ये बदल करून त्यांचा वापर होण्याची शक्यता आहे.
Chandrapur Dolby Sound Ban: आदेश नेमका काय सांगतो
अशा उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरावरून मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच अशा साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
साऊंड सिस्टिम व सुधारित वाहने सिलबंद ठेवण्याचे निर्देश
आदेशानुसार डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टीस्पीकर) सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच अशा सिस्टिमच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी व बदल (Modify) केलेली वाहने यांच्या मालक व धारकांनी संबंधित साऊंड सिस्टिम आणि वाहने स्वतःच्या ताब्यात सिलबंद स्थितीत ठेवावीत. प्रतिबंधात्मक कालावधीत त्यांचा वापर अथवा उपयोग करू नये. हे निर्देश गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमांच्या आयोजकांनाही लागू राहतील.
मर्यादित ध्वनी पातळीतील साऊंड सिस्टिमला आदेश लागू नाही
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, 2000 मध्ये विहित करण्यात आलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टिमना हा प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही. जिल्ह्यातील सर्व संबंधित साऊंड सिस्टिम मालक, वाहनधारक, गणेश व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांच्या आयोजकांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






