येहोवा यिरे सोसायटी फसवणूक प्रकरणाचे प्रतिनिधिक छायाचित्र

येहोवा यिरे सोसायटीत तुमचे पैसे आहेत का?; चंद्रपुरात १३३२ गुंतवणूकदारांचे ८.६० कोटी अडकले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 31, 2026

चंद्रपूर : येहोवा यिरे सोसायटी फसवणूक प्रकरणी चंद्रपुरात संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, १३३२ गुंतवणूकदारांचे सुमारे ८.६० कोटी रुपये अडकल्याची तक्रार आहे. जादा व्याजाचे आमिष दाखवून रक्कम गोळा केल्याचा आरोप तक्रारीत आहे. गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. बाधित गुंतवणूकदारांनी कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष पेटला, एकाच दिवशी वाघाने २ शेतकऱ्यांना केले ठार)

जादा व्याजाचे व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या संचालकांविरुद्ध चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणात तब्बल १३३२ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

येहोवा यिरे सोसायटी फसवणूक: तक्रारीत काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकिशोर नामदेव मांडवकर (वय ५२, रा. आनंदवन चौक, द्वारकानगरी बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. येहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, चंद्रपूर (रजि. नं. CHD/CHD/RSR/CR130/2023-24) या संस्थेची स्थापना २३ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे झाली होती. संस्थेचे संचालक अपेक्षा स्नेहदिप जोब, अतुल सोपन बन्सोड, दुर्गा गौरंग मंडल, वैशाली मधुकर बुच्चे, पल्लवी रुषी वासेकर, तेजस्विनी अतित्या लोखंडे, प्रिती विनोद भिलकर, वैभव गुरुदेव चौधरी आणि विकास देवराव दुधबळे यांनी स्थानिक पातळीवर एजेंट, व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.

कोणत्या योजनांचे आमिष दाखवले गेले?

आरोपींनी विविध आकर्षक योजनांच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक चालवली होती. सोसायटीतर्फे बचत खात्यावर वार्षिक ४ टक्के व्याज, फिक्स डिपॉझिटवर ९.७५ टक्के व्याज, तसेच टीडीएस टाईम डिपॉझिट योजनेअंतर्गत १३९९ रुपये २२ महिने भरल्यानंतर २४ व्या महिन्यात ८४,१७४ रुपये देण्याचे किंवा ६८,००० रुपये एकदा भरून २४ महिन्या नंतर ८४,१७४ रुपये मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याशिवाय युवा बचत धन योजना, बचत धन योजना आणि एमआयएस मासिक बचत योजनेंतर्गत १४,१४५ रुपये तिमाही, २८,२९० रुपये सहामाही किंवा ५६,५८० रुपये वार्षिक भरल्यानंतर ४,५२,९२८ रुपयांचा दैनिक ठेव योजनेचा लाभ मिळण्याचे प्रलोभन देण्यात आले होते.

१३३२ गुंतवणूकदारांचे ८.६० कोटी

या आमिषाला बळी पडून फिर्यादी चंद्रकिशोर मांडवकर यांचे ८ लाख ८४ हजार १७४ रुपये आणि इतर १३३१ गुंतवणूकदारांचे ८ कोटी ५१ लाख ११ हजार ६६४ रुपये, असे एकूण ८ कोटी ५९ लाख ९५ हजार ८३८ रुपये संचालकांनी गोळा केले. मात्र, ठरल्याप्रमाणे पैशांचा परतावा न करता फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(५), ३१६(२), ३(५) सहकलम ३ एमपीआयडी (MPID) कायदा १९९९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, सद्यस्थितीत या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेद्वारे केला जात आहे.

गुंतवणूकदारांनी कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी साधावा संपर्क सदर प्रकरणात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या रक्कमेच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या गुंतवणूकदारांची रक्कम अद्याप परत मिळालेली नाही, अशा सर्व बाधित नागरिकांनी आपल्या गुंतवणूकीचे कागदपत्र जसे की, गुंतवणूकीचे सर्टिफिकेट, रक्कम जमा केलेल्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्या बँक खात्यावर पैसे हवे आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एमपीआय/प्र.क्र. ०९/पोल-११ दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ अन्वये गुंतवणूकदाराचे परिशिष्ट-१ प्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरून देण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील आर्थिक गुन्हे शाखा, दुर्गापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल कावळे यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment