सावली: सावली वाघ जेरबंद करण्याची मोहीम चंद्रपूर वनविभागाने अखेर यशस्वी केली आहे. व्याहाड उपक्षेत्रातील सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात टी-१२२ वाघाची दहशत होती. सुमारे सहा वर्षांचा हा वाघ मागील महिनाभर या भागात फिरत होता. वनविभागाच्या माहितीनुसार, त्याने तीन गुराख्यांचा बळी घेतला होता. २७ सप्टेंबर २०२६ पासून विशेष मोहीम सुरू होती. ३० बाय ३० फुटांच्या मोठ्या पिंजऱ्यामुळे हा वाघ पकडला गेला. यामुळे गुराखी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वृद्धावर वाघाचा हल्ला, वाचा हि बातमी)
सावली वाघ जेरबंद: व्याहाड परिसरात किती दहशत होती?
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर व वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून सतत धुमाकूळ घालणाऱ्या आणि नागरिकांमध्ये व गुराख्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या सुमारे ६ वर्षे वयाच्या ‘टी-१२२’ (T-122) या नरभक्षक वाघास चंद्रपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाने अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या वाघाने जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या तीन गुराख्यांचा बळी घेण्यासोबतच मानवावर प्राणघातक हल्ले केले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर हा वाघ जेरबंद झाल्यामुळे वनविभागाने आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
३० बाय ३० फुटांचा भव्य पिंजरा: काय आहे नवा प्रयोग?
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दिनांक २७ सप्टेंबर २०२६ पासून चंद्रपूर वनविभातर्फे सावली वनपरिक्षेत्रात एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये वाघ पकडण्यासाठी वनविभागाच्या इतिहासात प्रथमच ३० बाय ३० फूट आकाराच्या एका विशेष आणि भव्य पिंजऱ्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. सामान्यतः वाघासारखा मोठा हिंस्त्र प्राणी सहजासहजी पिंजऱ्यात जेरबंद होत नाही आणि अशा मोहिमांसाठी महिनोंमहिने संसाधने, मनुष्यबळ व मोठा खर्च करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी चंद्रपूर प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घनश्याम नायगमकर आणि ब्रह्मपुरी विभागाचे जीवशास्त्रज्ञ श्री. राकेश अहूजा यांनी आपल्या दीर्घ अनुभवातून व कल्पकतेतून या विशेष भव्य पिंजऱ्याची संकल्पना व डिझाईन तयार केले होते. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे चंद्रपूर वनविभागाच्या कार्यक्षमतेचे महत्त्व सर्वत्र अधोरेखित झाले आहे.
मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर श्री. रामानुजम आणि विभागीय वन अधिकारी श्री. राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक वनसंरक्षक श्री. विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी जेरबंदी मोहिमेसाठी ९ गरुडा सीसीटीव्ही, २० ट्रॅप कॅमेरे, ३ लाईव्ह कॅमेरे आणि ५० ते ६० वनकर्मचारी व मजुरांनी २४ तास अहोरात्र पहारा दिला होता.
ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष श्री. बंडूजी धोतरे, मानद वन्यजीव रक्षक श्री. मुकेश भांदककर, जीवशास्त्रज्ञ श्री. अक्षय नारनवरे, तसेच सेवानिवृत्त असूनही वनविभागाला मोलाची साथ देणारे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. छोनकर, क्षेत्र सहाय्यक श्री. मारुती पुल्लेवाड, शूटर श्री. प्रदीप कोडापे यांच्यासह संबंधित क्षेत्राचे वनरक्षक, मूलचे एसटीपीएफ (STPF) पथक, चंद्रपूरचे आरआरयू (RRU) पथक आणि पीआरटी (PRT) चमूने अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व संयुक्त प्रयत्न केले. या सर्व यंत्रणेच्या सामूहिक आणि अहोरात्र परिश्रमांमुळेच हा धोकादायक वाघ जेरबंद करणे शक्य झाले असल्याची माहिती सावलीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. सी. धुर्वे यांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






