Nagbhid Tiger Captured : नागभीडमध्ये टी ६१ वाघीण जेरबंद करताना वनविभाग पथक

नागभीडमध्ये २ जणांचा बळी घेणारी T-61 SAF वाघीण अखेर जेरबंद

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 28, 2026

नागभीड: Nagbhid Tiger Captured नागभीड परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवणारी ‘टी-६१ एसएएफ’ ही वाघीण अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. २८ ऑगस्ट रोजी मिंडाळा उपक्षेत्रातील जंगलात ही थरारक मोहीम राबवण्यात आली. (हे हि वाचा – बिबट्या रेल्वेसमोर धडकला)

या नरभक्षक वाघिणीने दोन निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. तसेच पाळीव जनावरांवर हल्ले सुरू ठेवल्याने गावात संताप पसरला होता. पशुवैद्यकीय पथक आणि पोलिसांच्या नेमबाजाने डार्ट मारून तिला सुखरूप बेशुद्ध केले.

Nagbhid Tiger Captured : मिंडाळा जंगलात थरारक बचाव मोहीम

परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवून दोन निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या आणि पाळीव जनावरांवर हल्ले करणाऱ्या ‘टी-६१ एसएएफ’ (T-61 SAF) या नरभक्षक मादी वाघिणीला अखेर वनविभागाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी नागभीड वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मिंडाळा उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८७-पी मध्ये ही यशस्वी मोहीम राबवून वाघिणीला ट्रँक्विलायझर डार्टच्या साहाय्याने बेशुद्ध करण्यात आले. या कारवाईमुळे शेतकरी, शेतमजूर आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

‘टी-६१ एसएएफ’ वाघिणीने २ नागरिकांचा घेतला होता बळी

नागभीड आणि ब्रम्हपुरी वनक्षेत्रात ‘टी-६१’ या वाघिणीने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला होता. १९ मे २०२६ रोजी किटाळी मेंढा येथील रहिवासी वनिता शंकर उईके यांच्यावर एफडीसीएम कंपार्टमेंट १०९ मध्ये हल्ला करून वाघिणीने त्यांना ठार केले होते. या घटनेची भीती ताजी असतानाच, ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जनकापूर येथील रमेश जयराम काशिवार (वय ५४) हे गट क्रमांक १६८ मधील आपल्या शेतात काम करत असताना वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. याशिवाय या परिसरातील पाळीव प्राण्यांनाही या वाघिणीने लक्ष्य केले होते. ही वाघीण सतत गावशिवारात व शेती परिसरात वावरत असल्याने नागरिक आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले होते, तसेच नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता.

भविष्यात संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी या वाघिणीला जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. त्यानुसार २८ ऑगस्ट रोजी मिंडाळा उपक्षेत्रातील जंगलात शोधमोहीम राबवण्यात आली. वाघिणीचा ठावठिकाणा मिळताच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (चंद्रपूर) पशुवैद्यकीय अधिकारी तथा आर.आर.टी. (RRT) प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी आवश्यक औषधी डार्ट तयार केला. त्यानंतर अचूक निशाणा साधत पोलीस हवालदार तथा नेमबाज (शूटर) अजय सी. मराठे यांनी वाघिणीवर डार्ट मारून तिला सुरक्षितरीत्या बेशुद्ध केले. बेशुद्ध झालेल्या वाघिणीला सुरक्षित पिंजऱ्यात हलवून पुढील तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत ब्रम्हपुरीचे सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) अरविंद जे., नागभीडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) भारती एस. बगमारे, ब्रम्हपुरीचे वन्यजीव तज्ज्ञ राकेश आहुजा, मिंडाळाचे क्षेत्र सहायक एम. पी. तावाडे यांच्यासह वनरक्षक व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच या कारवाईदरम्यान विकास ताजने, योगेश लाकडे, प्रफुल एन. वाटगुरे, गुरुनानक ढोरे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे आणि अक्षय दांडेकर यांची महत्त्वाची उपस्थिती होती. वनविभागाच्या या जलद आणि यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमधील भीतीचे सावट दूर झाले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment