गोंडपिपरी – गोंडपिपरी अपघात प्रकरणात मोटारसायकलच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजता घडली. गोंडपिपरी-आष्टी मार्गावरील कन्यका राईस मिलसमोर, सुरगाव हद्दीत हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या बयानानुसार, मोटारसायकल वेगात होती. गोंडपिपरी पोलिसांनी ९ नोव्हेंबरला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तपास सुरू असून आरोप तपासानंतरच स्पष्ट होतील. (फटाके फोडण्यावरून वाद, कुटुंबाला मारहाण, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पायदळ जाणाऱ्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोंडपिपरी ते आष्टी जाणारे हायवे रोडवरील कन्यका राईस मिलसमोर, सुरगाव हद्दीत घडली. याप्रकरणी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोटारसायकल चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
गोंडपिपरी अपघात: नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी पोलीस शिपाई मुन्नेश्वर इतवारीलाल रात्रे हे पोलीस ठाण्यात हजर असताना गोंडपिपरी ते आष्टी जाणारे हायवे रोडवरील कन्यका राईस मिलजवळ अपघात झाल्याची माहिती फोनवरून मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रस्त्यावरून एक इसम गंभीर जखमी होऊन पडलेला आढळला आणि काही अंतरावर विना नंबरची रॉयल एनफील्ड ३५ क्लासिक ही मोटारसायकल पडून असल्याचे दिसून आले. घटनास्थळी जमलेले प्रत्यक्षदर्शी साक्षदार तनवीर हनुमंतू पेंशटीवार (रा. भंगाराम तळोधी) व सोमेश्वर देवराव बावणे (रा. गोंडपिपरी) यांनी पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
गोंडपिपरी अपघात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला घटनाक्रम
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडामधून एक इसम पायदळ गोंडपिपरीकडे येत असताना, पाठीमागून विठ्ठलवाडा बाजूनेच गोंडपिपरीकडे जाणारी विना नंबरची रॉयल एनफील्ड मोटारसायकल डबलसीट वेगात आली. मोटारसायकल चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून पायदळ जाणाऱ्या त्या इसमाला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन आदळले, ज्यामुळे मोटारसायकल चालकालाही दुखापत झाली. अपघातानंतर चालकाचे नाव विचारले असता त्याने आपले नाव समीर नितीन काकडे (वय २२, रा. विठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) असे सांगितले. घटनेनंतर जखमी चालकाला व त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला त्यांच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने उपचारासाठी हलवले.
गोंडपिपरी अपघात, जखमीला रुग्णालयात हलवले, डॉक्टरांनी मृत घोषित केले
दरम्यान, रस्त्याच्या कडेला गंभीर व अज्ञातावस्थेत पडलेल्या जखमी इसमाला तातडीने उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या इसमाला मृत घोषित केले. मृत इसम अनोळखी असल्याने उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी पोलीस शिपाई मुन्नेश्वर रात्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विना नंबरच्या रॉयल एनफील्ड मोटारसायकलचा चालक समीर नितीन काकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवाजी विठोबाजी निखाडे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







