वरोरा – Warora Accident News: वरोरा शहरातील लगान बार व टीव्हीएस शोरूम परिसरात बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) सायंकाळी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोपापूर येथील रहिवासी सौरभ हिरादेवे आणि त्याचा चुलत भाऊ अजित हिरादेवे हे दोघे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी वरोरा येथे आले होते. परत जाताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. वरोरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (घरफोडी केली आणि दुचाकी नेली, वाचा चोरीची बातमी)
वरोरात लायसन्ससाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू Warora Accident News
वरोरा शहरातील लगान बार आणि टीव्हीएस शोरूम परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २३ सप्टेंबर २०२६) सायंकाळी ६:१५ ते ६:३० वाजेच्या सुमारास घडली. बोपापूर (ता. वरोरा) येथील रहिवासी असलेला सौरभ रमेश हिरादेवे (वय २७) आणि त्याचा चुलत भाऊ अजित पंढरी हिरादेवे (वय ३०) हे दोघे आपल्या ‘यामाहा एफझेड’ मोटारसायकलने (क्रमांक MH-34-CA-1628) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी वरोरा येथे आले होते. काम आटोपून सायंकाळच्या सुमारास दोघेही मोटारसायकलने बोपापूरकडे परत जात असताना लगान बारजवळ चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात व निष्काळजीपणाने धडक दिली.
या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सौरभ हिरादेवे याला मृत घोषित केले. तर अजित हिरादेवे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, वाटेतच भद्रावतीजवळ अजितचीही प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्याचा मृतदेहही उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील शवगृहात ठेवण्यात आला. एकाच गावातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी मृतांचे काका नंदकिशोर रामभाऊ हिरादेवे (वय ४८, रा. बोपापूर-ताडाळा) यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, आरोपीविरुद्ध मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १३४ व १८४ तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६(१), १२५(b) आणि २८१ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक ढोके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि फरार चालकाचा शोध वरोरा पोलीस घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






