Nagbhid Brahmapuri Accident संदर्भात महामार्गावर पलटी झालेल्या कारचा तपास

नागभीड-ब्रम्हपुरी रोडवर भीषण अपघात; चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

नागभीड: Nagbhid Brahmapuri Accident : नागभीड ते ब्रम्हपुरी महामार्गावर कोर्धा गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा एक मन हेलावून टाकणारा अपघात घडला आहे. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मारुती सुझुकी कारला पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत १२ वर्षीय मुलीसह कारचालकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत.

धडक देणारा अज्ञात वाहनचालक अपघातानंतर वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (जेवणावरून हत्या, थरारक बातमी वाचा)

उपजिल्हा रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, विरली (ता. लाखांदूर, जि. भंडारा) येथील रहिवासी हिमेश बंडू बेदरे (वय ४१) हे आपली पत्नी मैथुला बेदरे (वय ३५), मुलगा शौर्य बेदरे (वय १०) आणि मुलगी श्रावणी बेदरे (वय १२) यांच्यासह, तसेच नातेवाईक नितीन विनायक भर्रे (वय ३२), वैष्णवी नितीन भर्रे (वय २५), आरोही नितीन भर्रे आणि एक वर्षाची चिमुकली नित्या नितीन भर्रे (सर्व रा. बोडेगाव, ता. ब्रम्हपुरी) यांच्या समवेत शनिवारी सकाळी बल्लारशाह येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. भेट आटोपून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सर्व जण हिमेश बेदरे यांच्या मारुती सुझुकी एस्टिलो कारने (क्रमांक MH 31 CD 9189) बोडेगावकडे परत येण्यासाठी निघाले.

Nagbhid Brahmapuri Accident : कोर्धा गावाजवळ उभी कार रस्त्याखाली उलटली

रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील भोतमांगे ढाब्यावर जेवण आटोपल्यानंतर रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास ते पुन्हा प्रवासाला निघाले. यावेळी कारचे सारथ्य नितीन भर्रे करत होते. कोर्धा गावाच्या काही अंतरावर आल्यावर चेहऱ्यावर पाणी मारून सुस्ती घालवण्यासाठी नितीन यांनी कार महामार्गाच्या डाव्या बाजूला सुरक्षित थांबवली. त्याच वेळी पाठीमागून भरधाव आणि निष्काळजीपणे आलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार थेट रस्त्याच्या खाली फेकली जाऊन पलटी झाली.

चिमुकलीसह चालकाचा जागीच मृत्यू, सहा नातेवाईक जखमी

महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढले व रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेले चालक नितीन विनायक भर्रे आणि १२ वर्षीय श्रावणी हिमेश बेदरे यांना उपचारासाठी नागभीड येथील सरकारी दवाखान्यात हलवले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेले हिमेश बेदरे यांच्यासह इतर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी हिमेश बेदरे यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे), २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५(अ), १२५(ब) (गंभीर दुखापत करणे) तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ आणि १८७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वेल्हाळ डोंगरवार हे फरार वाहनचालकाचा शोध घेत पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment