राजुरा :– Rajura Police Controversy : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिला नगरसेविका मंगला मोकडे यांच्या कुटुंबीयांशी अरेरावी करणे, शिवीगाळ करणे आणि बेपत्ता मुलीच्या आईशी अपमानास्पद वर्तन केल्याप्रकरणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. (जेवणाच्या वादावरून हत्या, वाचा गुन्हेगारी बातमी)
Rajura Police Controversy : कौटुंबिक चौकशीदरम्यान अरेरावी आणि शिवीगाळीचा आरोप
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना राजुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांमार्फत तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर कुणाल मोकडे यांना चौकशीसाठी राजुरा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कुणाल च्या विनंतीवरून राजुरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हरजितसिंग संधू हे दुपारी १ ते ३ च्या दरम्यान विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी अरेरावीची भाषा वापरून कोण धोटे, कोण भोंगळे, सर्व राजकारणी #$@## आहेत. अशी अशोभनीय भाषा वापरली. कुणाल मोकडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींबाबतही अशोभनीय व अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या तपासात विधवा आईशी अपमानास्पद वर्तनाचा दावा
दरम्यान, १८ ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या १४ वर्षीय मुलगी हिच्या बेपत्ता प्रकरणात तिची आई यांनी तपास अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे मुलीबाबत चौकशी केली असता, समाधानकारक माहिती न देता त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मुलीच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असलेल्या आईला संवेदनशीलतेने मार्गदर्शन व तपासाबाबत माहिती देण्याऐवजी गैरशब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामान्य नागरिक, विशेषतः महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, न्यायाच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात येतात. अशा वेळी त्यांच्याशी संवेदनशील, सन्मानपूर्वक आणि कायदेशीर पद्धतीने वागणे अपेक्षित असताना गैरवर्तनाचे आरोप होत असतील, तर त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांची सत्यता तपासावी, दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर तसेच विभागीय कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास गांभीर्याने व तत्परतेने करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, खासदार प्रतिभाताई धानोरकर, राजुरा विधानसभा आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच राजुरा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास तालुका काँग्रेस कमिटी तथा सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे,महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शहराध्यक्षा संद्याताई चांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, संतोष देरकर, प्रणय धोटे, भाजप पदाधिकारी गरसेवक भुपेश मेश्राम, नगरसेवक एजाज अहमद, पुणम गिरसावळे, अन्नुताई संधु, निता बानकर, फरीना सय्यद, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, सामाजिक कार्यकर्ते संगीता धोटे, सुमित्राबाई कुचनकर, मंगला हांडे, प्रणय लांडे, मधुकर झाडे, संघपाल देठे यासह शहरातील महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






