Fake Medical Certificate GMC Chandrapur press conference allegation

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये आरोपीला वाचवण्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र? दोषी डॉक्टरांवर निलंबनाची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 31, 2026

चंद्रपूर: Fake Medical Certificate GMC अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र देण्यात आले. लोक जनशक्ती पार्टीने पत्रकार परिषदेत हा खळबळजनक आरोप केला आहे. पोलीस कोठडी टाळण्यासाठी आरोपीला अनफिट दाखवण्यात आले होते. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात SIR प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध)

संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Fake Medical Certificate GMC : चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील गंभीर प्रकार

नोकरीचे आमिष दाखवून सुमारे दीडशे महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कायदेशीर कारवाई व पोलीस कोठडीपासून वाचवण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (GMC) डॉक्टरांनी संगनमत करून खोटे ‘मेडिकल अनफिट’ प्रमाणपत्र दिल्याचा खळबळजनक आरोप लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) पत्रकार परिषदेत केला आहे. या संपूर्ण गैरप्रकारात लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त करत दोषी डॉक्टर व पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष (माजी सैनिक) मनोज वसंत ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

१५० महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक १०३०/२०२६ (कलम ३१८(४), ३१९(२), ३५१(२) व ३(५)) मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र मिठूलाल सारसर (वय ५७ वर्षे) हा २३ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस कोठडीत असताना त्याला छातीत दुखत असल्याच्या कारणावरून सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी कोणतीही सखोल शारीरिक तपासणी व वैद्यकीय कागदपत्रांची शहानिशा न करता डॉ. श्वेता यांनी आरोपीच्या केवळ तोंडी सांगण्यावरून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आणि छातीत दुखण्याचा त्रास असल्याचे नमूद करून अतिदक्षता विभागात (ICU) भरती असल्याचे व ‘मेडिकल अनफिट’ असल्याचे बनावट पत्र पोलिसांच्या नावे दिले. विशेष म्हणजे या पत्रावर कोणताही आवक-जावक क्रमांक नसताना त्यावर औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुखांचा (HOD Medicine) शिक्का मारून ते पत्र न्यायालयात सादर करण्यात आले, ज्यामुळे आरोपीला वैद्यकीय कारणास्तव दिलासा मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

या धक्कादायक प्रकाराबाबत लोजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (Dean) यांची भेट घेऊन जाब विचारला असता, डॉ. श्वेता यांनी सदर पत्रावर केवळ आपली स्वाक्षरी असून ते पत्र आपण स्वतः लिहिले नसून शिक्काही आपण मारला नसल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिष्ठात्यांनी कारवाईचे आश्वासन देत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय क्र. १ यांच्याकडे नवीन अहवाल सादर केला. या सुधारित अहवालात आरोपीच्या दाखल दिनांकात फेरफार करण्यात आली असून त्याला मधुमेह, रक्तदाब किंवा दम्याचा कोणताही आजार नसल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे आधी दिलेले प्रमाणपत्र पूर्णपणे खोटे व बनावट असल्याचे उघड झाले.

दरम्यान, २७ ऑगस्ट २०२६ रोजी लोजपा पदाधिकाऱ्यांनी संबंधित दोषी डॉक्टरांवर काय कारवाई केली अशी विचारणा केली असता, अधिष्ठात्यांनी उद्धट वर्तन करत कार्यालयातून बाहेर काढल्याचा आरोप मनोज ठेंगणे यांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालण्यासाठी रुग्णालय प्रशासनातील डॉक्टरांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी लोजपाने केली आहे.

लोजपाच्या आरोपावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि नवीन डॉक्टर असल्याने ती चूक झाली मात्र लक्षात आल्यावर आम्ही चूक सुधारली, आणि राहिला प्रश्न उद्धट वर्तन केल्याची तर माझ्या केबिनमध्ये सीसीटीव्ही आहे. आरोप करणे सोपे मात्र केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment