चंद्रपूर : चंद्रपूर मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने पुन्हा संधी दिली आहे. विशेष सखोल पुनरीक्षणात (एसआयआर-२०२६) ASDD म्हणून नोंद झालेल्या मतदारांसाठी ही सुविधा आहे. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार मतदारांना ASDD म्हणतात. त्यांना १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान गणना प्रपत्र भरता येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी पात्र मतदारांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. (चंद्रपुरात युवासेनेचे शायना एनसी विरोधात आंदोलन, सविस्तर वाचा)
चंद्रपूर मतदार यादी: कोणत्या मतदारांना संधी?
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने नाव नोंदणीची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये, या उद्देशाने संबंधित मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नोंदींची आकडेवारी, चंद्रपूर मतदार यादी
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत एकूण २ लाख ७० हजार १५३ मतदारांच्या विविध प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१ हजार ९१३ मृत मतदार, २८ हजार ५३२ अनुपस्थित, १ लाख ६२ हजार ८४४ कायमस्वरूपी स्थलांतरित, २५ हजार ६२३ आधीच नोंदणी झालेले आणि इतर १ हजार २४१ मतदारांचा समावेश आहे. अशा मतदारांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांना त्यांचा पूर्वीचा मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांक वापरून आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ‘ECINET’ ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येईल.
या प्रक्रियेनुसार, पूर्वीच्या पत्त्यावरच वास्तव्यास असलेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत ‘परिशिष्ट-ब’ मधील निवेदन, तर राज्यांतर्गत स्थलांतरित मतदारांनी नवीन पत्त्याचा तपशील व पुराव्यासह ‘परिशिष्ट-क’ मधील निवेदन सादर करणे आवश्यक आहे. अशा स्थलांतरित मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-८ सादर करण्याची गरज नाही. तसेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान यापूर्वीच नमुना-६ सादर केलेल्या मतदारांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सॲप, ई-मेल व एसएमएसद्वारे प्रपत्र उपलब्ध करून देतील; शिवाय ‘Book a Call with BLO’ सुविधेद्वारेही मतदारांना अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे. (चंद्रपूर मतदार यादी)
महत्त्वाच्या तारखा, चंद्रपूर मतदार यादी
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ पर्यंत असून, त्यांचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत केला जाईल. ASDD मतदारांसाठी १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन होऊन प्राप्त प्रपत्रांचा निपटारा १० डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यात येईल, तर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. तरी पात्र मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून नाव नसल्यास संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विहित मुदतीत कागदपत्रे सादर करावीत, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






