चंद्रपूर मतदार यादी पुनरीक्षण बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी वसुमना पंत

प्रारूप मतदार यादीत नाव नाही? चंद्रपूरमध्ये पात्र मतदारांना पुन्हा संधी, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची राजकीय पक्षांसोबत बैठक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 23, 2026

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) अंतर्गत प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२३ नोव्हेंबर) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (एएसडीडी) नोंद झाल्याने नाव वगळले गेलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पक्षांना करण्यात आले. गणना प्रपत्र सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार, खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी, वाचा सविस्तर)

चंद्रपूर मतदार यादी पुनरीक्षण: कोणत्या मतदारांना संधी?

विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-2026) अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार (एएसडीडी) म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 23) सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार नोंद झालेल्या मतदारांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी समन्वय साधून सहकार्य करावे, याबाबत चर्चा करण्यात आली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी संबंधित मतदान केंद्रांच्या सूचना फलकांवर, पंचायत भवन, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, गटविकास अधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या chanda.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गणना प्रपत्र सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली असून, प्राप्त प्रपत्रांचा निपटारा 10 डिसेंबर 2026 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांपर्यंत या संधीची माहिती पोहोचविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. तसेच पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींमार्फत संबंधित मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले.

बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment