चंद्रपूर : चंद्रपूर मुंबई रेल्वे सेवा आणि चंद्रपूर-पुणे मार्गावर विशेष गाड्या तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबई व पुण्यासाठी दैनंदिन थेट रेल्वे नसल्याने विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार, वाचा सविस्तर)
महाराष्ट्राची ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबई व पुणे या प्रमुख शहरांसाठी आजही थेट दैनंदिन रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवून चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-पुणे मार्गावर तात्काळ विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर मुंबई रेल्वे सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
चंद्रपूर जिल्ह्यात मोठे औष्णिक वीज प्रकल्प, कोळसा खाणी आणि कागद गिरण्या कार्यरत असून राज्याच्या विकासात या जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. असे असतानाही, राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या पुण्यासाठी चंद्रपुरातून एकही दैनंदिन थेट रेल्वे गाडी नसल्याने हजारो विद्यार्थी, व्यापारी तसेच उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
चंद्रपूर येथे नवीन कोचिंग टर्मिनल आणि पिट लाईनच्या उभारणीला यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे, परंतु हे काम पूर्ण होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यातील जनतेला प्रवासासाठी प्रतीक्षा करणे शक्य नसल्याने, पर्यायी व्यवस्था म्हणून जोपर्यंत नवीन कोचिंग टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस धावणारी नवीन किंवा विशेष रेल्वे तातडीने सुरू करण्यात यावी, अशी आग्रही विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. या तात्काळ उपाययोजनेमुळे चंद्रपूरकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






