Chandrapur Illegal Baby Sale प्रकरणात एसआयटीच्या मागणीबाबत निवेदन

नवजात बाळ विक्रीमागे आणखी मोठे रॅकेट? विशेष तपास पथकाची महिला काँग्रेसची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 3, 2026

चंद्रपूर: (Chandrapur Illegal Baby Sale) चंद्रपूर शहरातील कथित नवजात बाळाच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी महिला काँग्रेसने केली आहे. पडद्यामागील सूत्रधार, संभाव्य मध्यस्थ आणि संपूर्ण रॅकेटचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणात तपासाचा विस्तार सुरू असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Chandrapur Illegal Baby Sale प्रकरणात एसआयटीची मागणी का झाली?

चंद्रपूर शहरात नवजात बाळाच्या बेकायदेशीर विक्रीचे जे रॅकेट उघडकीस आले आहे, ते अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि मानवतेला काळिमा फासणारे आहे. पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप नवजात जिवाचा सौदा करणाऱ्या अशा अमानुष प्रवृत्तींमुळे आज समाजात महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पडद्यामागील मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश करण्यासाठी आणि कोणतीही दिरंगाई न करता निष्पक्ष चौकशी होण्यासाठी तातडीने विशेष तपास पथक गठीत करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेनेकर यांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (सराईत गुन्हेगार अजय सरकार यांना हद्दपार करा, भाजपची मागणी)

यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेनेकर, शहर काँग्रेस महिला अध्यक्ष चंदाताई वैरागडे, महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका संगीता भोयर, नागरसेविका तवनगर शेख, अश्विनी खोब्रागडे, अनुताई दहेगावकर, मीनाक्षी गुजरकर, ऍड. प्रीती शहा, सुवर्णा लोखंडे, प्रतिभा पेंदाम, दीक्षा सातपुते यांची उपस्थिती होती.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात भाग्यश्री हांडे व सायली येरणे या महिलांना पॉक्सो आणि जुवेनाईल जस्टिस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. एका मातेने व तिच्या प्रियकराने स्वतःच्या नवजात बाळाचा सौदा केल्यानंतर, या महिलांनी त्या बाळाच्या बेकायदेशीर विक्रीत मुख्य भूमिका बजावल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या महिला एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्या असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू असून, या संपूर्ण रॅकेटच्या मागे एखादा मोठा राजकीय वरदहस्त असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावामुळे किंवा हस्तक्षेपामुळे या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या तपासावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, ही महिला काँग्रेसची ठाम भूमिका आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी या रॅकेटमध्ये आणखी कोणते मध्यस्थ, डॉक्टर, दलाल किंवा आंतरजिल्हा पातळीवरील मोठे सूत्रधार सक्रिय आहेत का? याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या जुन्या प्रकरणांचा आणि संशयास्पद घटनांचा देखील सखोल तपास याच प्रकरणासोबत जोडून करण्यात यावा; जेणेकरून बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या काळ्या धंद्याची नेमकी पायमुळे कोठे पसरली आहेत, हे जनतेसमोर येईल. पडद्यामागे लपलेले इतर छुपा चेहरा असलेले आरोपी, दलाल आणि त्यांचे धागेदोरे शोधून त्यांना तात्काळ गजाआड करण्यात यावे, अशी मागणी ॲड. जेनेकर यांनी प्रामुख्याने लावून धरली आहे.

चंद्रपूर पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणात तात्काळ विशेष तपास पथक नेमून दोषींविरुद्ध न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर करावेत व त्यांना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रभावी प्रयत्न करावेत. तसेच, संबंधित पीडित नवजात बाळाच्या सुरक्षिततेची, आरोग्याची व संगोपनाची योग्य ती जबाबदारी प्रशासनामार्फत सुनिश्चित करण्यात यावी. या प्रकरणात जर आरोपींना पाठीशी घालण्याचा, तपास भरकटवण्याचा किंवा जुन्या प्रकरणांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला, तर चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा ॲड. कुंदा जेनेकर यांनी दिला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment