चंद्रपूर : चंद्रपूर पाणी कपात करण्याची सूचना महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत देण्यात आली. अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक झाली. आयुक्तांनी १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १० टक्के कपात करण्याची सूचना दिली. कपातीच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले. (चंद्रपुरात उपजीविका केंद्र, रोजगाराच्या संधी, वाचा हि बातमी)
पाणीगळती रोखणे आणि सर्व नळांना टोट्या बसवणे याचेही आदेश देण्यात आले. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी व निर्देशांच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीस माननीय आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका, कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग, उपमुख्य अभियंता महानिर्मिती, अधीक्षक अभियंता महानिर्मिती, शहर अभियंता चंद्रपूर महानगरपालिका तसेच कार्यकारी अभियंता चंद्रपूर महानगरपालिका यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत चंद्रपूर शहरासाठी उपलब्ध जलसाठा, पाण्याची सद्यस्थिती, भविष्यातील पाण्याची गरज तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून आगामी काळात नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – आयुक्तांचे आवाहन
यावेळी माननीय आयुक्तांनी चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करण्याचे आवाहन केले. पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळणे ही प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पाणीगळती रोखण्यासह सर्व नळांना टोट्या बसविण्याचे आदेश
शहरातील पाणीगळती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी मनपा प्रशासनाला दिले. तसेच सर्व नळांना आवश्यकतेनुसार नळाच्या टोट्या बसविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. पाणीगळतीची ठिकाणे शोधून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि पाण्याचा अनावश्यक अपव्यय रोखणे यावर विशेष भर देण्यात आला.
१६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपातीची सूचना
अल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी दि. १६ ऑक्टोबर २०२६ पासून किमान १० टक्के पाणी कपात करण्याची सूचना माननीय आयुक्तांनी दिली. या पाणी कपातीचे नियोजन, अंमलबजावणी आणि त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले.
महानिर्मितीकडून वॉटर रिसायकलिंगवर भर
औद्योगिक वापरासाठी पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने महानिर्मितीने वॉटर रिसायकलिंग करून पुनर्वापरित पाण्याचा वापर करावा, अशा सूचना माननीय आयुक्तांनी दिल्या.
यावेळी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी महानिर्मितीकडून वॉटर रिसायकलिंगचे काम करण्यात येत असून पुनर्वापरित पाण्याचा वापर केला जात असल्याची माहिती बैठकीत दिली. औद्योगिक वापरासाठी पुनर्वापरित पाण्याचा अधिकाधिक वापर करून पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
पाणी बचतीसाठी व्यापक जनजागृती
पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याची बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही आयुक्तांनी मनपा प्रशासनाला दिले. यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम, नागरिकांशी संवाद, शाळा-महाविद्यालये व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश देण्याचे निर्देश देण्यात आले.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती नियंत्रण, पाण्याचा काटकसरीने वापर, औद्योगिक पाण्याचा पुनर्वापर आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






