चंद्रपूर दुष्काळ पंचनामे संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची आढावा बैठक

चंद्रपूर दुष्काळ पंचनामे: १२ तालुक्यांतील सर्व पंचनामे १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 7, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर दुष्काळ पंचनामे १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. कमी पर्जन्यमान आणि पावसातील दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. या तालुक्यांतील १,५७९ गावांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या ५० ते ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही स्पष्ट केले. तहसीलदारांनी दररोज आढावा घेऊन माहिती गुगल शीटमध्ये नोंदवावी, असे निर्देश आहेत. (पाणी जपून वापरा, १६ ऑक्टोबरपासून चंद्रपुरात पाणी कपात, वाचा महत्वाची बातमी)

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याबाबत प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक तहसीलदाराने दररोज सायंकाळी पंचनाम्याच्या कामाचा आढावा घ्यावा. किती क्षेत्राचे आणि किती खातेदारांचे पंचनामे झाले, याची अद्ययावत माहिती गुगल शीटमध्ये नियमितपणे नोंदवावी.

राज्य शासनाकडून पंचनाम्याच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात असल्याने 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावे. तालुका आणि ग्रामस्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवावा. पंचनाम्यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी तहसीलदारांनी वेळोवेळी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन कामाची पडताळणी करावी. पंचनाम्यात भरलेली माहितीची फेरतपासणी करावी. प्रत्येक पंचनाम्यावर संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक असून, पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची यादी चावडी, ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करावी.

 पिण्याच्या पाण्याचे स्रोत राखीव ठेवा

पाणीटंचाईचा आढावा घेताना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, सध्या उपलब्ध असलेले जलस्रोत प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. राखीव जलस्रोतांमधून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. सध्या पाणी उपलब्ध असले तरी आगामी उन्हाळा आणि पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने उपलब्ध जलसाठा आणि संभाव्य मागणीचा विचार करून आतापासूनच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये जलतारा तसेच जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. संबंधित विभागांनी या कामांसाठी निश्चित उद्दिष्ट ठरवून तातडीने अंमलबजावणी सुरू करावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीबाबत कोणत्याही बँकेची तक्रार येणार नाही, याची बँकांनी दक्षता घ्यावी. तसेच जिल्ह्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, याची तालुकानिहाय माहिती पशुसंवर्धन विभागाने तातडीने सादर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, महावितरणचे अधिक्षक अभियंता मनोज दाभर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरेश कुंबरे, भुजल वैज्ञानिक लिना बाराहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment