चंद्रपूर : चंद्रपूर एमडी पावडर जप्त करण्याची कारवाई रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे. इंदिरानगर येथील एका घरावर छापा टाकून २४.२६० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त करण्यात आली. छाप्याची माहिती लागताच आरोपी हनिफ करीम शेख याने नागपूरच्या दिशेने पळ काढला. रामनगर पोलिसांनी बुटीबोरी पोलिसांना कळवले. बुटीबोरी टोल प्लाझावर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून एकूण ७४,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. (शेतात सुरु होता जुगार, गडचांदूर पोलिसांची कारवाई, वाचा गुन्हेगारीची बातमी)
इंदिरानगरमध्ये छापा, घरात सापडली एमडी पावडर
रामनगर गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने इंदिरानगर, चंद्रपूर येथील रहिवासी हनिफ करीम शेख याच्या घरावर अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान त्याच्या घरात बंदी घातलेला अंमली पदार्थ एमडी पावडर मिळून आला. मात्र, पोलिसांची धाड पडल्याची भनक लागताच आरोपी हनिफ शेख याने घटनास्थळावरून नागपूरच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्परता दाखवत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा पाठलाग सुरू केला. आरोपी नागपूरच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच रामनगर पोलिसांनी तात्काळ बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली.
बुटीबोरी टोल प्लाझावर सापळा, आरोपी ताब्यात
घटनेचे गांभीर्य ओळखून बुटीबोरी पोलिसांनी बुटीबोरी टोल प्लाझा येथे सापळा रचून आरोपी हनिफ करीम शेख याला ताब्यात घेतले आणि मागाहून आलेल्या रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी केलेल्या या संपूर्ण कारवाईत आरोपीकडून ७२,७८० रुपये किमतीची २४.२६० ग्रॅम एमडी पावडर, १६०० रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि ३० झिपलॉक प्लास्टिक पन्न्या असा एकूण ७४,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सरतर्फे कृष्णा दराडे यांच्या लेखी रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात कलम ८(क), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ साळुंखे करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन पांदरे, तसेच पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिपेडाम, सुरेश कोरवार, पंकज पांडे, सूरज शेडमाके आणि ब्ल्युटी साखरे यांनी संयुक्तरित्या केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






