चंद्रपूर : कान्हाळगाव व्याघ्र प्रकल्प घोषित करावा, अशी मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कान्हाळगाव अभयारण्य रद्द न करता तेथे व्याघ्र प्रकल्प करावा, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री आणि केंद्रीय वन मंत्रालयाला निवेदन पाठवले आहे. (स्वतंत्र शेतकरी आयोग स्थापन करा – आमदार मुनगंटीवार यांची मागणी)
कान्हाळगाव व्याघ्र प्रकल्पाची मागणी काय आहे?
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे ५० वे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झालेले ‘कान्हाळगाव अभयारण्य’ रद्द करण्याची मागणी करण्याऐवजी, तेथे स्थानिक गावांच्या विकासासाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण व आग्रही मागणी ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष, प्रख्यात पर्यावरण अभ्यासक तथा केंद्रीय वन मंत्रालयाच्या समितीचे माजी सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री आणि केंद्रीय वन मंत्रालयाला सविस्तर निवेदन पाठवून या परिसराच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
ताडोबा आणि तेलंगणातील कवाल व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने कान्हाळगाव हा परिसर वाघ व इतर वन्यजीवांसाठी अत्यंत उत्कृष्ट भ्रमण मार्ग (कॉरिडॉर) आहे. २६९.४० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे हे आरक्षित क्षेत्र महाराष्ट्राचे ५० वे वन्यजीव अभयारण्य म्हणून १५ मार्च २०२१ रोजी घोषित करण्यात आले होते. हे क्षेत्र तेलंगणातील कवल, ताडोबा, गडचिरोली आणि इंद्रावती वन्यजीव क्षेत्रांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, वाघ आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तसेच जवळच्या गावांसाठी पर्यटन व विकासाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी स्पष्ट केले आहे.
अभयारण्य रद्द न करण्याची भूमिका
या अभयारण्याच्या पार्श्वभूमीची आठवण करून देताना प्रा. चोपणे यांनी म्हटले आहे की, २०१४-२०१५ मध्ये त्यांच्याच आग्रहामुळे तत्कालीन राजुराचे आमदार तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय धोटे आणि तत्कालीन वरिष्ठ अधिकारी प्रवीण परदेशी यांनी कान्हाळगावला वन्यजीव अभयारण्य म्हणून संमती दिली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यात अनेक चांगल्या योजना यशस्वीपणे राबविल्या होत्या. मात्र, सध्या मा. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कान्हाळगाव अभयारण्य रद्द करावे, अशी मागणी केली आहे. ही मागणी रद्द करून या परिसराचे जतन करण्यासाठी व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी करावी, असे आवाहन प्रा. चोपणे यांनी केले आहे.
कान्हाळगाव परिसराचे भौगोलिक, वन व वन्यजीव दृष्टिकोनातून असलेले महत्त्व विशद करताना त्यांनी नमूद केले की, या जंगलात सतत वाहणारे पाण्याचे झरे, १५ कोटी वर्षांपूर्वीचे लाकडाचे जीवाश्म, वृक्षांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रजाती, सुमारे २० वाघ आणि शेकडो वन्यजीव प्रजातींचे वास्तव्य आहे. या घनदाट जंगलात मानवी वस्ती किंवा गावे अत्यंत कमी प्रमाणावर आहेत. जर कान्हाळगावला वन्यजीव अभयारण्य कायम ठेवून व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले, तर या भागात पर्यटनाला मोठी चालना मिळेल. यामुळे स्थानिक पातळीवर दुकाने व व्यवसाय वाढतील,ू तरुणांना पर्यटकांसाठी वाहने व जिप्सी उपलब्ध होतील, शिक्षणाचा स्तर उंचावेल आणि गावातील तरुणांना हक्काचा रोजगार व आर्थिक लाभ मिळतील. तसेच पर्यावरण, वन्यजीव आणि हवामान सुरक्षित राहून दुष्काळ टळेल आणि वनशेतीला प्राधान्य मिळेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे ५० वर्षांपूर्वी ५२ टक्के असलेले जंगल आज घटून केवळ ३० टक्क्यांवर आले आहे, ही चिंतेची बाब आहे. अलीकडच्या काळात या परिसरात काही कोळसा खाणी आणि पूर्वी विमानतळाचे प्रस्ताव आल्यामुळे कान्हाळगावच्या अस्तित्वाला विरोध होण्याची किंवा अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा कोणताही धोका टाळण्यासाठी प्रा. सुरेश चोपणे, नागरिक आणि विविध वन्यजीव संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः एक पर्यावरण अभ्यासक असून त्यांनी यापूर्वी अनेक उत्तम कार्ये केली आहेत, त्यामुळे त्यांनी केवळ संरक्षित स्थळ म्हणून नव्हे तर कान्हाळगावला ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी आग्रही विनंती प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







