चंद्रपूर – चंद्रपूर वीज केंद्र चोरी प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या (CSTPS) कोळसा हाताळणी विभागातील क्रॅशर हाऊसमधून सुमारे ६०० किलो साहित्य चोरीला गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८:२० ते १०:३० च्या दरम्यान घडली. (वेकोलि कर्मचाऱ्याच्या घरी चोरी, वाचा बातमी)
चंद्रपूर वीज केंद्र चोरीची घटना कशी उघडकीस आली?
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या (CSTPS) सुरक्षिततेला मोठा सुरुंग लावत कोळसा हाताळणी विभागातून चक्क ६०० किलो वजनाचे जड लोखंडी साहित्य चोरट्यांनी लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वीज केंद्रासारख्या अतिसंवेदनशील आणि कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरात घडलेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन इसम, चंद्रपूर वीज केंद्र चोरी
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांपासून ते १० वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभाग (ड) मधील संच क्रमांक ८ आणि ९ च्या क्रॅशर हाऊस परिसरात घडली. या प्रकरणी वीज केंद्रात उप कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले समीर महादेवराव पुणेकर (वय ३९, रा. क्वार्टर नं. डी-६४/२, सीएसटीपीएस वसाहत, उर्जानगर, चंद्रपूर) यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली आहे.
घटनेच्या दिवशी १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास साहाय्यक अभियंत्यांनी तक्रारदार समीर पुणेकर यांना दूरध्वनी करून क्रॅशर हाऊसमध्ये चोर शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर पुणेकर यांनी तात्काळ कार्यकारी अभियंत्याना यासंदर्भात कल्पना दिली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणेकर हे आपल्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आणि सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांसह थेट घटनास्थळावरील क्रॅशर हाऊसमध्ये पाहणीसाठी पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तीन अज्ञात इसम अत्यंत चलाखीने हातामध्ये जड साहित्य घेऊन जाताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले होते.
कोणते साहित्य चोरीला गेले?, चंद्रपूर वीज केंद्र चोरी
चोरट्यांनी क्रॅशर हाऊसमधील ‘बीटर आर्म हँमर असेम्बली’ नावाचे साहित्य लांबवले असून, यामध्ये प्रत्येक असेम्बलीचे वजन सुमारे ४० किलो आहे. अशा एकूण १५ जुन्या व वापरलेल्या बीटर आर्म हँमर असेम्बली चोरट्यांनीळ पळवून नेल्या आहेत. अंदाजे ६०० किलो वजनाच्या या संपूर्ण साहित्याची बाजारातील किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या महाऔष्णिक वीज केंद्रात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून लोखंडी साहित्य लांबवल्यामुळे यंत्रणेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी चोरी करून पसार होत असल्याचे दिसून आल्यामुळे पोलीस आता या डिजिटल पुराव्याच्या आधारे चोरांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजू योगिराज गोखरे हे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







