चिमूर – Chimur Congress Janakrosh Morcha अंतर्गत शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार एल्गार पुकारला. चिमूर पंचायत समिती ते तहसील कार्यालय दरम्यान हा विराट मोर्चा काढण्यात आला.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोर्चामध्ये सहभागी होत स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्यावर थेट निशाणा साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून सत्ताधारी कंत्राटांमध्ये मग्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
“कंत्राट लाटणाऱ्या ठेकेदार आमदाराला जनतेच्या दुःखाची जाणीव नाही”: विजय वडेट्टीवार
शेतकरी संकटात, तरुण बेरोजगारीच्या खाईत, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले आणि कष्टकरी वर्ग सरकारी धोरणांच्या कचाट्यात सापडलेला असताना सत्ताधाऱ्यांना मात्र जनतेच्या प्रश्नांपेक्षा कंत्राटांमध्येच अधिक रस असल्याचा घणाघाती आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. “कंत्राटातून मलिंदा लाटणाऱ्या ‘ठेकेदार आमदाराला’ जनतेच्या समस्यांची काय जाणीव?”, असा थेट सवाल करत त्यांनी चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसच्या वतीने चिमूर येथे काढण्यात आलेल्या जनाक्रोश महामोर्चाने सत्ताधाऱ्यांविरोधातील संतापाला जाहीर व्यासपीठ दिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ट्रॅक्टर, बैलगाड्या घेऊन मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Chimur Congress Janakrosh Morcha: हजारो शेतकरी ट्रॅक्टर अन् बैलगाड्यांसह रस्त्यावर
चिमूर येथील पंचायत समिती जवळून या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तर स्थानिक तहसील कार्यालयावर उपस्थित जनतेला संबोधित करताना आ. वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार केला. शेतकऱ्यांनी पीकविमा भरूनही नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करायची, पिकांचे नुकसान झाले तरी सरकारी यंत्रणांच्या दारात हेलपाटे मारायचे आणि दुसरीकडे सत्तेतील लोकांनी विकासाच्या नावाखाली कंत्राटांची गणिते मांडायची, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
“ज्यांच्या हातात जनतेने सत्ता दिली, त्यांनी जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी विधिमंडळ सभागृहात मागील बारा वर्षापासून मौन व्रत धारण करून स्वतःच्या हिताचे राजकारण केले, तर जनता शांत बसणार नाही,” असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. तसेच ब्रह्मपुरी क्षेत्रात मागील दहा वर्षात गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत 80 टक्के सिंचन व्यवस्था करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम मी केले असल्याचे आ विजय वडेट्टीवार म्हणाले.
शिवानी वडेट्टीवार यांचा जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवरून हल्लाबोल
ते भांगडडिया या ठेकेदार आमदाराने रस्ते व त्याची कंत्राटी आपल्या मनमर्जीतील कार्यकर्त्यांना देऊन त्यांना मालामाल करण्यापलीकडे काहीच काम केले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्ही ठेकेदारी नाही तर सेवाधर्म निभवतो असे त्यावेळी म्हणाले.
मोर्चाला संबोधित करताना प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाले की, चिमूरच्या आमदाराने कंत्राट मिळवण्याच्या पलीकडेही पराक्रम गाजविला असून नागपुरात चक्क गरिबांच्या हक्काच्या घरावरही कब्जा केला आहे याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. चिमूर क्षेत्रात जलजीवन विषयांची अनेक कामे रेंगाळलेली असून सत्ताधारी आमदार मात्र चुप्पी साधून बसले आहे. क्षेत्रातले रस्ते रखडले जनतेची कामे होत नाही अशी आज विदारक परिस्थिती चिमूर विधानसभा क्षेत्रात असल्याची टीका त्यांनी केली.
चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती, सोयाबीन-कापूस पिकांचे नुकसान, पीकविमा भरपाईचा प्रश्न आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे काँग्रेसने मांडले. मोर्चामध्ये पीकविमा नुकसानभरपाई, चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, पीककर्ज माफी, सातबारा कोरा करणे, धान बोनस आणि घोषित अनुदानाची तातडीने अंमलबजावणी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. आयोजित जन आक्रोश मोर्चास युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ,चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर किरसान यांचे चिरंजीव ॲड. दुष्यंत किरसान , काँग्रेस पदाधिकारी विजय गावंडे प्राध्यापक राम राऊत, जुनेद खान, विजय घरत, गजानन बुटके ,धनराज मुगले, किशोर शिंगरे ,विवेक कापसे, खोजरम मरसकोल्हे, विनोद बोरकर, राजू लोणारे, इरफान खान, यांचे सह तालुक्यातील काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते.
ट्रॅक्टर-बैलगाड्यांचा लोंढा चिमूरमध्ये जनआक्रोशाचा उद्रेक
मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले ते शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात दाखल झाले. महिलांचा आणि युवकांचा सहभागही लक्षणीय होता.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






