सिंदेवाही – Sindewahi Congress Janakrosh Morcha च्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने विविध प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी हा भव्य मोर्चा निघणार आहे. शेतकरी, शेतमजूर, ओबीसी समाज आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात तालुकाभरातून हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. (हे हि वाचा – सरपंच सह सर्व सदस्यांवर अविश्वास ठराव मंजूर)
आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचे नेतृत्व
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी समाज तसेच श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सिंदेवाही येथे भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून, तालुकाभरातून हजारो नागरिक सहभागी होण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे..
महामोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता आ. विजय वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालय येथून होणार असून, शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. शासनाकडून विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने हे जनआंदोलन उभारण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस आणि कर्जमाफीची प्रमुख मागणी
महामोर्चाद्वारे शासनाकडे सन २०२५-२६ मधील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान बोनस देणे, २०१७ पूर्वी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे, राज्यातील स्मार्ट मीटर योजना रद्द करून बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढणे, गोसेखुर्द धरणाचे पाणी बारमाही उपलब्ध करून देणे, ओबीसी समाजाला खुल्या प्रवर्गातही आरक्षणाचा लाभ देणे, जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवणे, ओबीसी वसतिगृह प्रवेशासाठी बंद असलेले ऑनलाइन पोर्टल सुरू करणे, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे सहा महिन्यांचे थकीत मानधन तातडीने वितरित करणे, रासायनिक खते, कीटकनाशके व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, समाजकल्याण विभागाच्या निधीचा एससी-एसटी घटकांवरच खर्च करावा, कृषी पंपांची सौर योजनेतील सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे वीज जोडणी द्यावी, अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीप्रकरणी कठोर कारवाई करावी तसेच भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे सक्तीने भूसंपादन करू नये, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
हा महामोर्चा केवळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नसून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने उभारलेले व्यापक जनआंदोलन असल्याचे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी समाज, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे , शहर काँग्रेस, महिला काँग्रेस युवक काँग्रेस, तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






