राजुरा: Subbai Gram Panchayat Dispute प्रकरणी राजुरा तालुक्यातील सुब्बई येथे २० ऑगस्ट रोजी वादळी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून युवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांच्यासह सर्व सदस्यांवर ठराव क्रमांक १६ अन्वये अविश्वास ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रशासनाने येत्या १५ दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. (हे हि वाचा – शिक्षकांना पोलिसांनी शिकवले कायद्याचे धडे)
राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सुब्बई ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि युवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या वादळी ग्रामसभेत सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांच्यासह सर्व सदस्यांवर ठराव क्रमांक १६ अन्वये सर्वानुमते अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
४ वर्षांत एकही महिला ग्रामसभा नाही; ग्रामस्थांचा संताप
सुब्बई ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारून चार वर्षांचा कालावधी उलटला तरी गावात एकही महिला ग्रामसभा घेण्यात आली नव्हती. २० ऑगस्ट रोजी ग्रामसभा होणार असल्याचे केवळ एक दिवस आधी गावात दवंडी देऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कामाची रोजी सोडून ४०० हून अधिक महिला, पुरुष व युवक ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित झाले होते.
सभा रद्द करण्याचा प्रयत्न, युवकांच्या रेट्यामुळे सभा सुरू
ग्रामसभेच्या ठिकाणी झालेली मोठी गर्दी आणि नागरिकांचा रोष पाहून सरपंच सुरेखा आत्राम यांनी सुरुवातीला सभा रद्द झाल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांचे झालेले आर्थिक नुकसान आणि प्रशासकीय दिरंगाई पाहून उपस्थित युवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा घेण्याचा आग्रह धरला. अखेर सरपंचांना ग्रामसभेत उपस्थित राहावे लागले.
माफीचा प्रस्ताव फेटाळला, राजीनाम्यावर नागरिक ठाम
ग्रामसभेदरम्यान गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमधील कामकाजावर आणि भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित करत थेट राजीनाम्याची मागणी केली. यावर सरपंचांनी “राजीनामा देणार नाही, पण गावाची माफी मागते,” अशी भूमिका मांडली. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी माफी अमान्य करत राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आणि शेवटी सर्व सदस्यांसह सरपंचांवर अविश्वास ठराव पारित केला.
ग्रामसेवकांची अनुपस्थिती
ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे ते ग्रामसभेला उपस्थित राहू शकले नाहीत. सरपंचांना निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात आले.
१५ दिवसांत अपात्र न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
येत्या १५ दिवसांच्या आत संबंधित सरपंचांसह सर्व सदस्यांना अपात्र घोषित न केल्यास प्रशासनाविरोधात संपूर्ण गावकरी, महिला व युवक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावाच्या विकासासाठी आणि पारदर्शकतेसाठी युवकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






