Chandrapur Gramsevak Morcha protest rally to collector office

अधिकाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू; चंद्रपुरात भव्य मूक मोर्चा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 1, 2026

चंद्रपूर : Chandrapur Gramsevak Morcha जळगाव जिल्ह्यातील शिवरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. (हे हि वाचा – आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी दिले बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र)

जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अधिकारी सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

Chandrapur Gramsevak Morcha : जळगाव घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर कर्तव्यावर असताना जमावाकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या घटनेच्या तीव्र निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.

शिवरे ग्रामपंचायतीत कर्तव्यावर असताना अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

१७ ऑगस्ट २०२६ रोजी शिवरे ग्रामपंचायतीची नियमित ग्रामसभा सुरू असताना जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे आणि प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन श्री. पाटील यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामसभा कामकाजावर पुकारलेला बहिष्कार आजही ठामपणे सुरू ठेवला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ग्रामसभेवर बहिष्कार

या भव्य मूक मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर केले. यामध्ये शिवरे घटनेतील दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच वारंवार होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांमुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा घेण्याची कायदेशीर तरतूद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यासोबतच ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तींकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर कायदेशीर बंदी घालण्यात यावी, संवेदनशील व मोठ्या ग्रामपंचायतींच्या बैठकांसाठी प्रशासनाकडून सक्तीने व विनामूल्य पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण यांसारख्या इतर विभागांच्या योजनांच्या विशेष ग्रामसभांची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवावी आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याऐवजी तालुका पातळीवर संबंधित विभागामार्फत अंतिम करावेत, अशा महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तात्काळ कायदेशीर व पोलीस संरक्षण न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment