चंद्रपूर : Chandrapur Yuva Sena किटाळी चौक ते ईरई नदी पूल आणि किटाळी गावादरम्यानच्या रस्त्यावरील चिखल हटवण्यासाठी युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवले आहेत.
खड्डे बुजवले असले तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. त्यामुळे नागरिक, वाहनचालक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मूक मोर्चा)
सार्वजनिक बांधकाम विभागाने या चिखलाची विल्हेवाट न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांच्या मार्गदर्शनात आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वाखाली किटाळी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Chandrapur Yuva Sena : किटाळी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आक्रमक
किटाळी चौक ते ईरई नदी पुलीया तसेच किटाळी चौक ते किटाळी गावादरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत पोहोचला असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी व चिखल साचल्याने नागरिक, वाहनचालक आणि विशेषतः दररोज ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढल्याने युवासेनेने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली होती.
युवासेनेच्या निवेदनानंतर प्रशासनाने तात्काळ बुजवले खड्डे
युवासेनेच्या वतीने निवेदन सादर केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल युवासेनेने आभार मानले असले, तरी रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय अद्याप कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील साचलेल्या चिखलाची तात्काळ विल्हेवाट लावून पाण्याचा योग्य निचरा करावा आणि रस्त्याचे डांबरीकरण व्यवस्थित करावे, अशी आग्रही मागणी पुन्हा करण्यात आली आहे.
या मार्गावरील चिखल हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित न केल्यास युवासेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
हे निवेदन देताना चंद्रपूर तालुकाप्रमुख सागर गभणे, शहरप्रमुख सय्यद फरदीन, तालुका समन्वयक पवन उडाके, विवान रामटेके, आरिश शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दीकी, सलमान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, काशिफ शेख, शाहजान शेख, रोशन खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, रितिक रायपुरे, मंगेश रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






