चंद्रपूर – निर्मल उज्ज्वल सोसायटी प्रकरणामुळे नागपूरसह इतर भागांतील ठेवीदारांचे लक्ष संस्थेच्या सद्यस्थितीकडे लागले आहे. ठेवींबाबत कोणती माहिती अधिकृतरीत्या उपलब्ध आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय सहकारी संस्था निबंधकाच्या संकेतस्थळावर संस्थेशी संबंधित नियामक नोंदी आणि कलम ८६ अंतर्गत नोटीस सूचीबद्ध आहे. (वाघाला पकडण्यासाठी ३० फुटाचा पिंजरा, वाचा बातमी))
नागपूर येथील प्रतिष्ठित ‘निर्मल उज्ज्वल क्रेडिट सोसायटी‘मध्ये सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे ठेवीदारांचे पैसे अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, इतर संस्थांप्रमाणे या सोसायटीचे संचालक पळून गेलेले नाहीत किंवा संस्थेच्या कार्यालयाला टाळेही लागलेले नाही. उलटपक्षी, संचालक मंडळ दररोज कार्यालयात उपस्थित राहून परिस्थितीला तोंड देत आहे आणि प्रत्येक ठेवीदाराचा एक अन् एक पैसा सुरक्षित असून तो टप्प्याटप्प्याने परत केला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
असे असतानाही, काही स्वार्थी तत्त्वे या परिस्थितीचा चुकीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील काही महाभाग या संकटाच्या काळात स्वतःचे उखळ पांढरे करण्यात मग्न आहेत. स्वतःला सर्वांचे तारणहार किंवा ‘देव’ समजणारे हे लोक इतर सामान्य व भाबड्या ठेवीदारांना हाताशी धरून गोंधळ घालत आहेत. संचालकांवर अनुचित दबाव आणून आणि धमक्या देऊन केवळ स्वतःचेच पैसे आधी वसूल करण्यासाठी हे महाभाग सर्व शक्ती पणाला लावत आहेत.
ठेवीदारांच्या भावनांचा खेळ आणि दबावतंत्र
या तथाकथित नेत्यांची ‘वाणी’ आणि वक्तृत्व हे सर्वसामान्य ठेवीदारांच्या हितासाठी नसून, केवळ स्वतःची अडकलेली रक्कम निघून यावी यासाठीच वापरले जात आहे. इतर ठेवीदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे.
संस्थेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा संचालकांचा प्रामाणिक मानस आहे. अडकलेली रक्कम ही तांत्रिक समस्यांमुळे टप्प्याटप्प्याने दिली जात आहे. जर काही मोजक्या लोकांनी दबावाची नीती वापरून स्वतःचे पैसे आधी काढून घेतले, तर त्याचा थेट फटका इतर हजारो प्रामाणिक व संयमी ठेवीदारांना बसू शकतो.
संयमाची आणि सहकार्याची गरज
सध्याच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता आणि अशा दबाव आणणाऱ्या महाभागांच्या चिथावणीला बळी न पडता सर्व ठेवीदारांनी संयम बाळगण्याची अत्यंत गरज आहे. संचालक मंडळ जबाबदारीने काम करत असताना आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना, काही लोकांनी संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेला अडथळा सर्वांच्याच हिताला बाधा पोहोचवणारा ठरू शकतो.
त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांनी एकजुटीने अशा स्वार्थी वृत्तीचा निषेध केला पाहिजे आणि संस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, अशी भावना सुजाण सभासदांमधून व्यक्त होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






