जांभूळघाट आश्रमशाळा टक्कल प्रकरणानंतर चिमूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेची इमारत

जांभूळघाट आश्रमशाळेत ८२ विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल केल्याचा आरोप; अधीक्षकांना नोटीस

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 5, 2026

चिमूर: जांभूळघाट आश्रमशाळा टक्कल प्रकरणामुळे चिमूर तालुक्यात पालकांमध्ये तीव्र संताप आहे. शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील सुमारे ८२ विद्यार्थ्यांचे केस विचित्र पद्धतीने कापल्याचा आरोप होत आहे. शिस्तीच्या कारणावरून अधीक्षकांनी नाभिकाला तसे निर्देश दिल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पालकांनी अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता चिमूर आदिवासी प्रकल्पाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (उपचारासाठी २० किमी पायपीट, चंद्रपूर जिल्ह्यातील वास्तव, वाचा हि बातमी)

जांभूळघाट आश्रमशाळा टक्कल प्रकरण: नेमकं काय घडलं?

चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या निवासी आश्रमशाळेत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. निवासी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून ते दैनंदिन शिस्तीपर्यंतची संपूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांच्या केस कर्तनासाठी शासनस्तरावर एका नाभिकाची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आश्रमशाळा परिसरात नेहमीप्रमाणे मुलांचे केस कर्तन सुरू होते. केस कापण्याची प्रक्रिया सुरू असताना काही विद्यार्थी परिसरात खेळत होते. याच कारणावरून संतापलेल्या अधीक्षकांनी नाभिकाला थेट विद्यार्थ्यांचे अर्धे टक्कल करण्याचे व विचित्र पद्धतीने ट्रिमर फिरवण्याचे निर्देश दिल्याचा आरोप आहे. या हुकुमामुळे सुमारे ८२ विद्यार्थ्यांचे केस अत्यंत विचित्र अवस्थेत कापले गेले. विद्यार्थ्यांच्या संमतीविना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला थेट धक्का पोहोचवणाऱ्या या कृत्यामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि भावनांवर गंभीर परिणाम झाला आहे.

अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस; मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी संबंधित अधीक्षक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते, अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. या दाव्याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, या संशयास्पद बाबीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गिरी यांनी अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त एका तासासाठी चिमूरला गेलो होतो, परत आल्यावर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार सांगताच अधीक्षकांना नोटीस दिल्याचे स्पष्टीकरण मुख्याध्यापकांनी दिले आहे.

मात्र, केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून हे प्रकरण दडपता येणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अपमानास्पद शिक्षा देण्याचे अधिकार अधीक्षकांना कुणी दिले, असा संतप्त सवाल विचारत पालकांनी अधीक्षकांसह मुख्याध्यापकांवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या मान-सन्मानाची जपणूक करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या घटनेची दखल घेऊन चौकशी करावी, पीडित विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. आता चिमूर आदिवासी प्रकल्प आणि आदिवासी विकास विभाग या गंभीर प्रकारावर काय पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment