जिवती तालुक्यातील भारी आरोग्य केंद्राची इमारत

भारी आरोग्य केंद्र नावापुरतेच; जिवतीत रुग्णांची २० किमी पायपीट

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 4, 2026

जिवती / चंद्रपूर: भारी आरोग्य केंद्र सध्या केवळ नावापुरते उरले आहे. जिवती तालुक्यातील या उप-प्राथमिक केंद्रात नियमित डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी तब्बल २० किलोमीटर दूर शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. हा भाग आदिवासी बहुल आणि दुर्गम आहे. रस्त्यांची सोयही अपुरी आहे. (विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू, वाचा दुर्दैवी घटना)

याबाबत सोरेकसा ग्रामपंचायतीने प्रशासनाला निवेदन दिले आहे. नियमित डॉक्टर न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सागर कोटनाके आणि सदस्य सुनील राठोड यांनी दिला आहे.

हा संपूर्ण परिसर आदिवासी बहुल असल्यामुळे येथे पुरेशा सोयी-सुविधांचा मोठा अभाव आहे. त्यातच ये-जा करण्यासाठी योग्य रस्त्याचीही सोय नाही. अशा बिकट परिस्थितीत भारी येथील उप-प्राथमिक आरोग्य केंद्र जर नियमित व सुव्यवस्थित सुरू राहिले, तर रुग्णांना होणारा हा नाहक त्रास कायमचा टळू शकतो आणि लगतच्या अनेक गावांतील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होऊ शकते.

अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन

भारी येथील उप-आरोग्य केंद्रात रुजू असलेल्या डॉक्टरांनी तेथेच स्थायी राहून नियमित वैद्यकीय सेवा पुरवावी, यासाठी सोरेकसा ग्रामपंचायतचे सरपंच सागर कोटनाके आणि सदस्य सुनील राठोड यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने कारवाईची विनंती केली आहे.

तसेच सोरेकसा ग्रामपंचायतीच्या अधिकृत पत्राद्वारे (Covering Letter) जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, चंद्रपूर), जिल्हा वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी जिवती यांना ईमेलद्वारे अधिकृत निवेदन पाठवण्यात आले आहे.

आंदोलनाचा इशारा

सध्या रुजू असलेल्या डॉक्टरांना तत्काळ उप-प्राथमिक आरोग्य केंद्र भारी येथे पाठवून हे केंद्र नियमितपणे सुरू ठेवण्यात यावे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता सोरेकसा ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा सरपंच सागर कोटनाके व सदस्य सुनील राठोड यांनी प्रशासनाला दिला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment