ब्रम्हपुरी भोंदूबाबा फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झालेले ब्रम्हपुरी पोलीस ठाणे

ब्रम्हपुरीत भोंदूबाबाकडून महिलेची ९८ हजारांची फसवणूक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 4, 2026

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी भोंदूबाबा फसवणूक प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गांगलवाडी येथील एका महिलेची तब्बल ९८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. पतीला गंभीर आजार आणि घरावर अरिष्ट असल्याची भीती दाखवण्यात आली. भिक्षुकाच्या वेशात आलेल्या व्यक्तीने पूजेच्या नावाखाली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले, अशी तक्रार आहे. (मित्रांना व्हिडीओ कॉल करीत तरुणाने मारली नदीत उडी, वाचा हि बातमी)

या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध कदम पुढील तपास करत आहेत.

ब्रम्हपुरी भोंदूबाबा फसवणूक: भिक्षुकाच्या वेशात आला आरोपी

गांगलवाडी येथील रहिवासी सौ. संध्या मनोहर मशाखेत्री (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गावात भिक्षा मागणारे दोन अनोळखी व्यक्ती आले होते. त्यापैकी एका भिक्षुकाने पांढरा शर्ट, काळी लुंगी, डोक्यावर लाल फेटा, हातात मोरपिसांचा झाडू व पुस्तक धारण केले होते. त्याने संध्या मशाखेत्री यांच्याकडे भिक्षा मागितली असता त्यांनी १० रुपये दिले. त्यानंतर त्याने घरातील सदस्यांबद्दल विचारपूस केली. घरच्यांची माहिती मिळताच त्याने ‘तुझ्या घरात किडा लागला आहे, पूजा करावी लागेल’ असे सांगून विविध धार्मिक विधीचे नाटक केले. त्यानंतर पतीच्या उशाखाली धागा ठेवायला सांगून, मोरपिसाने औक्षण करत आणि राख पाण्यात टाकून शिंपडण्यास सांगत पूजेच्या नावाखाली तात्काळ ८,००० रुपये उकळले.

पूजा आणि औषधांच्या नावाखाली पैसे उकळले

एवढ्यावरच न थांबता, त्याच रात्री आरोपीने ९८५०५७६०३७ या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार महिलेला फोन करून ‘तुझ्या घरात मरेखट लागली असून त्यासाठी औषध घ्यावे लागेल’ अशी भीती घातली. यासाठी त्याने ब्रम्हपुरी येथील ‘धनवंतरी आयुर्वेदिक दुकाना’चा पत्ता व चालकाचा संपर्क क्रमांक (९१५८४५४५५४) दिला. त्या दुकानदाराशी संपर्क साधला असता त्याने औषध महाग असल्याचे सांगून २० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार महिलेने २० सप्टेंबर रोजी दुकानात जाऊन १५,११५ रुपयांची औषधे खरेदी केली. पुन्हा २७ सप्टेंबर रोजी आरोपीच्या सांगण्यावरून त्यांनी त्याच दुकानातून २३,००० रुपयांची औषधे विकत घेतली.

यानंतर आरोपीने वारंवार फोन करून घरातील अरिष्ट दूर करण्यासाठी पूजेकरिता सोन्याचे दागिने व रोकड मागितली. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास आरोपीने तक्रारदार महिलेला तळोधी येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. तेथे मोटरसायकलवरून आलेल्या या भोंदूबाबाने ३०,००० रुपये नगदी आणि १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (ज्यात ६ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची दुसरी अंगठी आणि ३ ग्रॅमच्या बिऱ्यांचा समावेश होता) घेतले. दर्गात पूजा करून संध्याकाळी सर्व वस्तू आणि पैसे परत करतो असे सांगून आरोपी दागिने व रोख रक्कम घेऊन फरार झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संध्या मशाखेत्री यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत एकूण ३८,००० रुपयांची रोख रक्कम आणि ६०,००० रुपये किमतीचे १२ ग्रॅम सोने असा ९८,००० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध शहाजी कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment