एसटी चालक मारहाण प्रकरणातील वरोरा आगाराची एसटी बस

गावातून बस कसा नेतो तेच बघतो; वरोरा तालुक्यात एसटी चालकाला मारला झाडू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 4, 2026

वरोरा/शेगाव: एसटी चालक मारहाण प्रकरणामुळे वरोरा तालुक्यातील खेमजई परिसरात चर्चा सुरू आहे. शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या चालकाला झाडूने मारहाण आणि शिवीगाळ झाल्याची तक्रार आहे. शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी खेमजई बसस्टॉपवर ही घटना घडली. बसमध्ये शालेय विद्यार्थी होते. चालक आणि वाहकाला धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी शेगाव बुद्रुक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे तपास करत आहेत. (चंद्रपुरात वेश्याव्यवसाय, एलसीबीची धाड, वाचा हि बातमी)

एसटी चालक मारहाण: खेमजई बसस्टॉपवर नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील रहिवासी अनिल दादाजी डाहुले (वय ४९) हे गेल्या १७ वर्षांपासून एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असून सध्या वरोरा आगार येथे सेवा देत आहेत. शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास चालक डाहुले हे वाहक राजेश्वर गजानन दुस्सावार यांच्यासह वरोरा डेपोतून बस क्रमांक (MH-40 AQ 6047) घेऊन शालेय विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येरखेडाच्या दिशेने निघाले होते. सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास मौजा खेमजई येथील बसस्टॉपवर मुला उतरवण्यासाठी त्यांनी बस थांबवली असता, तेथील एका पानठेल्यासमोर झाडू मारत असलेला व्यक्ती अचानक बसच्या समोर येऊन उभा राहिला.

झाडूने मारहाण, वाहकालाही शिवीगाळ आणि धमकी

रस्त्यावरून बाजूला होण्याबाबत विचारणा केली असता, त्या व्यक्तीने संतापून बसच्या चालक गेटजवळ येत ‘खाकी वर्दीवाले हरामखोर आहेत’ असे म्हणत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरवात केली आणि हातातील झाडूने चालक डाहुले यांच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली. चालक डाहुले यांनी त्याला दारू पिऊन असल्याचे विचारले असता त्याने अधिकच आक्रमक होत त्यांना निघून जाण्यास सांगितले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी आलेले वाहक राजेश्वर दुस्सावार यांनाही त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ‘तुमच्या गावातून बस कशी नेता तेच मी पाहतो’ अशी धमकी दिली.

घटनेनंतर चालकाने स्थानिकांकडे विचारपूस केली असता, संबंधित व्यक्ती खेमजई येथील रहिवासी व तेथीलच पानठेला चालक प्रकाश चौधरी (वय अंदाजे ३७) असल्याचे निष्पन्न झाले. शासकीय गणवेशात सेवा बजावताना गैरवर्तन करून मारहाण, अपमान आणि धमकी दिल्याप्रकरणी चालक अनिल डाहुले यांनी शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश चौधरी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३२ (शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा अडथळा), २९६ (अश्लील कृत्य व शिवीगाळ), ३५१(२) (धमकी देणे) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुमित ईश्वर कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment