भद्रावती: Bhadravati MD Drugs Case मध्ये भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बस स्थानक परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमडी ड्रग्ज आणि मोबाईल फोन जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बस स्थानक परिसरात सापळा रचला होता. संशयित बालकाची झडती घेतली असता ५.२१ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २३ हजार रुपये आहे. (हे हि वाचा – भद्रावती मध्ये १ किलो गांजा जप्त)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भद्रावती पोलीस ठाण्यातील अंमलदारांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, भद्रावती बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाजवळ एक संशयित मुलगा काळ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान करून एमडी ड्रग्जची अवैध विक्री करण्यासाठी थांबला आहे. या बातमीची खात्री पटल्यानंतर भद्रावती पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची परवानगी मिळवली. त्यानंतर तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पार पाडत दोन स्वतंत्र पंच, शासकीय फोटोग्राफर आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा घेणाऱ्या मापाडी व्यक्तीला सोबत घेऊन पोलीस पथकाने बस स्थानक परिसरात सापळा रचला.
कमिशनच्या आमिषाने अल्पवयीन बालक अडकला जाळ्यात
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीतील वर्णनानुसार संशयित बालकाला ताब्यात घेतले. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कायदेशीर नियमांचे पालन करत त्याची झडती घेण्यात आली असता, त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून १० हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि उजव्या खिशातून एक बस तिकीट व प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. पंचांसमक्ष इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी केली असता ५.२१ ग्रॅम वजनाची आणि सुमारे १३ हजार रुपये मूल्याची ‘एमडी’ (Mephedrone) ड्रग्ज पावडर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर मुद्देमाल, मोबाईल आणि इतर साहित्य पंचांसमक्ष सीलबंद करून जप्त केले.
संशयित बालकाकडे अधिक चौकशी केली असता, हे ड्रग्ज त्याला चंद्रपूर येथील बाबूपेठ भागातील रहिवासी पुनीत चौधरी याने विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. गिऱ्हाईक शोधून ड्रग्जची विक्री केल्यास कमिशन देण्याचे आमिष पुनीतने दाखवले होते, त्यामुळे हे ड्रग्ज चंद्रपुरातून भद्रावती येथे विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष नारायण केदार यांच्या तक्रारीवरून विधीसंघर्षग्रस्त बालक आणि फरार आरोपी पुनीत चौधरी याच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २२(ब), २९ सह भारतीय न्याय संहिता कलम ९५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वीरेंद्र देवराव केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






