Police Ganja Raid - भद्रावती पोलिसांची गांजा जप्ती कारवाई

भद्रावती पोलिसांचा फुकटनगरमध्ये छापा: १ किलो गांजासह ६० वर्षीय वृद्धाला अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 28, 2026

भद्रावती – Police Ganja Raid अंतर्गत भद्रावती पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी फुकटनगर परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाच्या घरावर छापा मारला. या छाप्यादरम्यान १ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची किंमत २४ हजार ५०० रुपये आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – ट्रॅक्टर सोडविण्यासाठी मागितले २० हजार, एसीबीने तिघांना केली अटक)

मिळालेल्या सविस्तर बातमीनुसार, भद्रावती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा आणि त्यांचे पथक परिसरामध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी गस्त घालत होते. गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, फुकटनगर येथील रहिवासी संजय माणिक सोनुणे हा त्याच्या राहत्या घरी प्लास्टिकच्या पिशवीत गांजा ठेवून त्याची विक्री करत आहे.

१.१९३ किलो गांजा आणि मोबाईल जप्त

कारवाईत पारदर्शकता राहावी यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत दोन स्वतंत्र पंच, अधिकृत मापारी, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांना सोबत घेतले. तसेच संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण करण्याचे नियोजन करून सर्व तांत्रिक साहित्यासह पोलीस पथक रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फुकटनगर येथील संशयित आरोपीच्या घरासमोर पोहोचले. पोलिसांनी दारात आवाज दिल्यानंतर संजय सोनुणे याने दार उघडले. त्यावेळी उपस्थित पोलीस पथकाने त्याला स्वतःची ओळख पटवून दिली आणि त्याच्या घराची झडती घ्यायची असल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांनी आरोपीला कायद्यानुसार एनडीपीएस ॲक्टच्या कलम ५०(१) अन्वये सूचनापत्र देऊन, अन्य कोणत्याही वरिष्ठ किंवा राजपत्रित अधिकाऱ्यासमक्ष झडती घ्यायची आहे का, अशी विचारणा केली. मात्र आरोपीने इतर कोणत्याही अधिकाऱ्याची आवश्यकता नसल्याचे सांगून झडतीस सहमती दर्शवली. त्यानंतर पंचांसमक्ष घराच्या बेडरूमची पाहणी करण्यात आली. तेथे असलेल्या ड्रमच्या मागे एका पिवळ्या रंगाच्या पिशवीत प्लास्टिकची पन्नी लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. सदर पिशवी उघडून पाहणी केली असता त्यात उग्र वास येणारा ओलसर गांजा आढळला.

मापारी तापोश विश्वास यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजमाप केले असता २४ हजार रुपये मूल्याचा १.१९३ किलोग्रॅम गांजा निष्पन्न झाला. याशिवाय आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपये किमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच सीलबंद केला. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी संजय सोनुणे याने हा गांजा चंद्रपूर येथील गंज वॉर्डातील रहिवासी विलास पाड याच्याकडून खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय सोनुणे याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम ८(सी), २०(बी)(आयआय) आणि २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आणि तपास अधिकारी वीरेंद्र देविदास केदारे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment