warora-fraud-case

व्यापाऱ्यांची १ कोटी १३ लाखांची फसवणूक; वरोऱ्यातील पती-पत्नीवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 28, 2026

वरोरा: Warora Fraud Case मध्ये वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. नागपूर येथील व्यापाऱ्यांची १ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. घर, जमिनीचे भूखंड आणि सोन्याचे दागिने विकण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपी पती-पत्नीने रोख रक्कम आणि चेक घेऊन पळ काढला. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवकुमार रामचंद्रजी गुप्ता (वय ४५, रा. शांतीनगर, तुळशीनगर कॉलनी, नागपूर) हे नागपूर येथे शिवसागर डेरी दुकान चालवतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला ऑटोमोटीव्ह चौक, नागपूर येथे त्यांची भेट विनोद सोयाम (रा. शिवनेरी नगर, वरोरा) आणि त्याच्यासोबत असलेल्या रोहित उर्फ हर्ष या तरुणाशी झाली होती. त्यावेळी विनोद सोयाम याने आपली वरोरा येथील आणि मनीष नगर, नागपूर येथील मालमत्ता विकायची असल्याचे सांगून शिवकुमार गुप्ता यांना आपला मोबाईल क्रमांक दिला होता.

त्यानंतर विनोद सोयाम याने व्हॉट्सॲप कॉलवरून गुप्ता यांच्याशी संपर्क साधून वरोरा येथील बंगला, तीन रिकामे भूखंड, नागपूरमधील मनीष नगर येथील फ्लॅट आणि २०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा सर्व ऐवज एकूण १ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांत विकण्याचा व्यवहार ठरवला. या व्यवहारासाठी विनोद याने गुप्ता यांना वरोरा येथे येण्यास सांगितले.

वरोरा आणि नागपुरातील मालमत्ता विकण्याचा ठरला सौदा

सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तक्रारदार शिवकुमार गुप्ता हे आपले मित्र राम कृष्णकुमार भुत, अब्दुल सबुर अब्दुल सत्तार आणि अशोक नंदनवार यांच्यासह वरोरा येथे पोहोचले. तेथून आरोपी विनोद सोयाम हा त्यांना मोपेडवरून देशपांडे पेट्रोल पंपामागील शिवनेरी नगर येथील आपल्या घरी घेऊन गेला. तेथे त्याची पत्नी सौ. पायल विनोद सोयाम उपस्थित होती. दोघा पती-पत्नीने ठरलेल्या व्यवहारानुसार पैसे देण्यास सांगितले.

त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी आपापसात जमा केलेली ५६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम (गुप्ता यांचे १५ लाख, अब्दुल सत्तार यांचे १५ लाख, राम भुत यांचे ५ लाख आणि अशोक नंदनवार यांचे २१ लाख ५० हजार रुपये) तसेच एचडीएफसी बँक शाखा नागपूरचे २७ लाख आणि ३० लाख रुपयांचे दोन चेक, असे एकूण १ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांचे मूल्य आरोपी पती-पत्नीकडे सोपवले.

रक्कम आणि चेक हातात मिळताच आरोपी पायल सोयाम तेथून निघून गेली. तर आरोपी विनोद सोयाम याने रोख रक्कम आणि चेक अलमारीत ठेवून मालमत्तेचे मूळ कागदपत्रे आणण्याच्या बहाण्याने घराच्या आत प्रवेश केला. त्यानंतर तो कागदपत्रे न देताच घराच्या मागील दरवाजातून पळून गेला. व्यापाऱ्यांनी त्याला पळून जाताना पाहिले आणि त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. काही वेळाने त्याची पत्नी पायल सोयाम घरी परतली असता तिने “तुमचा आणि माझा काही संबंध नाही, माझ्या पतीशी काय ते बोला” असे सांगून त्यांना घरून निघून जाण्यास सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तात्काळ ११२ क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला आणि वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात आरोपी विनोद सोयाम आणि त्याची पत्नी पायल विनोद सोयाम (दोघे रा. शिवनेरी नगर, वरोरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश शामराव सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर व्यंकय्याजी मित्तलवार आणि तपास अधिकारी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment