Sudhir Mungantiwar Chandrapur Projects meeting in Mumbai

चंद्रपूर जिल्ह्याचा विकास वेगाने होणार; आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मुंबईतील बैठकीत यश

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 28, 2026

मुंबई : Sudhir Mungantiwar Chandrapur Projects च्या संदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १,७४० कृषी पंपांना वीजजोडणी मिळणार आहे. तसेच बल्लारपूर येथे ESIC रुग्णालय उभारले जाईल. याशिवाय ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. (हे हि वाचा – अधीर जुन्नावार ने राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धत पटकावले सुवर्ण)

मुंबईतील बैठकीत कोणते ५ मोठे निर्णय झाले?

बैठकीत राज्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे १,७४० कृषी पंपांना वीजजोडणी, बल्लारपूर येथील विसापूरच्या ३१.३५ हेक्टर जागेवर ESIC रुग्णालय, SRPF वसाहत व महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग, स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजना, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील वसाहतीच्या विकासकामांना गती तसेच ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.

या बैठकीस श्रीमती अभिलाषा झा ESIC क्षेत्रीय कार्यालय मुंबई,असिस्टंट डायरेक्टर जितेंद्र खैरनार, संचालक डॉक्टर अशोक थोरात,श्रीमती स्वाती कारले ॲडिशनल कलेक्टर MIDC, श्री संदीप हाके चीफ इंजिनीयर MSETCL मुंबई, दूरदर्शन प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमना पंत,तहसीलदार चंद्रपूर,चीफ इंजिनियर नागपूर आदींची उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व विषयांची ठाम मांडणी करत प्रलंबित बाबींवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.बैठकीत विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील १,७४० कृषी पंपांना तातडीने वीजजोडणी देण्याचा मुद्दा आ. मुनगंटीवार यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत बैठकीत मांडला. त्यावर येत्या १० दिवसांत सौर ऊर्जेच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे सर्व विभागांना विहित कालमर्यादेत कामे करण्याचे निर्देश

बल्लारपूर तालुक्यातील मौजा विसापूर येथील ३१.३५ हेक्टर बंद पॉवर हाऊसची जागा ESIC रुग्णालय, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) वसाहत तसेच महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पातील ₹५५० कोटींच्या निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती सखोल अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ८०० मेगावॅट संच कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच महाऔष्णिक वसाहतीतील रस्ते, नाल्या, गाळे, निवासस्थाने, स्विमिंग पूल व जिमसाठी निधी उपलब्ध करून विकासकामे गतीने पूर्ण करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. वसाहतीतील ५३० इमारतींपैकी १४३ इमारतींचे नूतनीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

चर्चेअंती मा. राज्यमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित बाबी विहित कालमर्यादेत पूर्ण कराव्यात, प्रत्येक विषयाचा नियमित आढावा घ्यावा आणि प्रगती अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन स्तरावर सातत्याने आणि ठामपणे मांडला जाईल, अशी ग्वाही दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला विषय प्रलंबित राहू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये चंद्रपूरला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी शासनाकडून आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय करून घेण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “चंद्रपूरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच माझी सर्वोच्च जबाबदारी असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जनहिताशी संबंधित प्रत्येक प्रश्न मार्गी लागेपर्यंत माझा पाठपुरावा अविरत सुरू राहील,” असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment