चंद्रपूर – Adheer Junnawar Skating Gold मिळवून चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बारामती येथे मॅरेथॉन स्केटिंग असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंडर-६ इनलाईन स्केटिंग प्रकारात अधीरने १ किलोमीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने आपल्या वेगाने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून सुवर्णपदकावर नाव कोरले. अभिनेते महेश देवकते यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट)
ही स्पर्धा केवळ वेगाची नसून चिकाटी, संतुलन, मानसिक ताकद आणि सातत्यपूर्ण सरावाची खरी कसोटी मानली जाते. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अधीरने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियंत्रित खेळ करत अखेरपर्यंत आपली आघाडी कायम राखली. त्याच्या दमदार आणि प्रभावी कामगिरीने उपस्थित प्रेक्षक, पंच आणि स्पर्धकांनाही प्रभावित केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते महेश देवकते यांच्या हस्ते अधीर जुन्नावार याला सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा गौरव केवळ अधीरसाठीच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
अत्यंत लहान वयात सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर अधीरने मिळवलेले हे यश त्याच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीची नांदी मानली जात आहे. या यशामागे त्याचे प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यांचा सिंहाचा वाटा असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
अधीरच्या या ऐतिहासिक आणि दिमाखदार यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, भविष्यात तो राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच सुवर्ण कामगिरी करून चंद्रपूरसह महाराष्ट्राचे नाव जगाच्या क्रीडा नकाशावर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करत त्याला आणि प्रशिक्षक विनोद निखाडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






