चंद्रपूर – Chandrapur Rain Red Alert मुळे जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्र आणि भारतीय हवामान खात्याने २९ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच ३० जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा धोका आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील जीर्ण रेल्वे उड्डाणपुलाचे ऑडिट करा – खासदार धानोरकर)
२९ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये आणि क्लासेसना पूर्ण सुट्टी जाहीर
या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना सुट्टी घोषित केली आहे. याशिवाय पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः खिडक्या आणि दरवाजांपासून दूर राहावे. रस्ता ओलांडताना अंडरपास, सखल भाग आणि पाणी साठलेल्या ठिकाणांवरून प्रवास करू नये. खराब दृश्यमानतेमुळे वाहने सावकाश चालवावीत किंवा थांबवावीत. तसेच विजेच्या तारा आणि पॉवर लाईन्सपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
वादळ आणि विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत उभे राहणे धोकादायक ठरू शकते. अशा वेळी तात्काळ पक्क्या इमारतीचा आसरा घ्यावा. इमारतीच्या बाल्कनी, छतावर अथवा ओट्यावर थांबू नये. शेतात किंवा मोकळ्या जागेत असल्यास सखल भागात जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. उंच झाडे, धातूचे मनोरे आणि तारांच्या कुंपणाजवळ अजिबात उभे राहू नये.
घरात असताना विजेची सर्व उपकरणे त्वरित बंद करावीत. विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये. तसेच शॉवरखाली अंघोळ करणे किंवा पाण्याचे नळ स्पर्श करणे टाळावे. उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहणे देखील तितकेच धोक्याचे आहे. धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूंमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.
नदी, नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यास ते ओलांडण्याचा धाडसी प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी सर्व सरकारी सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी ०७१७२ – २५००७७ हा मदत क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






