चंद्रपूर – Chandrapur Anjikar Automobile Theft प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर रोडवरील प्रसिद्ध अंजिकर ऑटोमोबाईल या कृषी साहित्य दालनातून तब्बल ४ लाख ७८ हजार रुपयांचे कृषी औजार चोरून विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शोरूमचे रक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकानेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (हे हि वाचा – नागपुरातील व्यापाऱ्यांना १ कोटी १३ लाखांचा गंडा)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नागपूर रोडवरील अंजिकर ऑटोमोबाईलचे मालक रोहन चंद्रकांत अंजिकर (वय ३९, रा. अरविंद नगर, मूळ रोड, चंद्रपूर) यांच्या दालनात ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे आणि स्पेअर पार्ट्सची मोठी विक्री केली जाते. या भव्य दालनात व्यवसाय सांभाळण्यासाठी अनेक कर्मचारी कार्यरत असून सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. २४ जुलै २०२६ रोजी रोहन अंजिकर शोरूममध्ये असताना त्यांचे मित्र अरुण भाई (रा. पडोली) यांनी फोन करून एका संशयास्पद व्यवहाराबाबत माहिती दिली. सुरक्षारक्षक कंत्राटदार विनयकुमार द्विवेदी हा ट्रॅक्टरचे फ्रंट गार्ड विक्रीसाठी आपल्या सेकंड हँड ट्रॅक्टर दालनात घेऊन आल्याचे अरुण भाई यांनी सांगितले. मात्र, सदर साहित्य खरेदी न करता अरुण भाई यांनी संशय आल्याने थेट रोहन अंजिकर यांच्याशी संपर्क साधला आणि व्हॉट्सॲपवर त्या साहित्याचे फोटो पाठवले. फोटो पाहताच ते साहित्य स्वतःच्याच शोरूममधील असल्याचे रोहन अंजिकर यांच्या लक्षात आले.
या प्रकारानंतर रोहन अंजिकर यांनी तातडीने शोरूमचे अकाउंटंट सुरेंद्र यांना जानेवारी २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीतील संपूर्ण स्टॉक आणि अवजारांचा लेखाजोखा तपासण्याचे आदेश दिले. स्टॉक रजिस्टर तपासले असता दालनातून १ मोठा रोटावेटर (किंमत १ लाख २२ हजार रुपये), १ लाख ४० हजार रुपये किमतीचे २ छोटे रोटावेटर, २० हजार रुपयांचे ५ ट्रॅक्टर फ्रंट गार्ड, ७२ हजार रुपये किमतीचे ३ कल्टिव्हेटर, २४ हजार रुपयांचे ८ स्वराज ऑइल बकेट आणि ३० हजार रुपये किमतीचे १० रोटावेटर ब्लेड बॉक्स असा एकूण ४ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निष्पन्न झाले.
सुरक्षारक्षकाने दिली चोरीच्या कटाची कबुली
साहित्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मालकांनी सेल्स एक्झिक्युटिव्ह संदेश गोवर्धन आणि सुपरवायझर मनोज सहाकाटे यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. संशयाची सुई सुरक्षारक्षक कंत्राटदार विनयकुमार द्विवेदी याच्याकडे वळल्यानंतर त्याची कडक चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा मान्य करत चोरीच्या संपूर्ण कटाचा उलगडा केला. रात्रीच्या वेळी गोदाम बंद झाल्यानंतर सुरक्षारक्षक कंत्राटदार विनयकुमार द्विवेदी, शोरूमचा चालक आफताब शौकत शेख, तसेच हेल्पर्स प्रशांत मुरलीधर महेलवार आणि उमेश अंकुश गेडाम या चौघांनी संगनमत करून गोदामातील कृषी साहित्य टाटा वाहनामध्ये भरून चोरून नेले व बाजारात विकून आलेली रक्कम आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली. कधीकधी दिवसभरातही संधी साधून हे साहित्य लंपास केले जात असल्याचे त्याने सांगितले.
ज्या कर्मचाऱ्यांवर विश्वासाने शोरूम आणि गोदामाची जबाबदारी सोपवली होती, त्यांनीच गेल्या दीड वर्षात संगनमत करून लाखो रुपयांच्या साहित्यावर हात साफ केल्याचे समोर आल्यानंतर रोहन अंजिकर यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. रोहन अंजिकर यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी कंत्राटदार विनयकुमार द्विवेदी, चालक आफताब शौकत शेख, हेल्पर प्रशांत महेलवार आणि उमेश गेडाम या चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा प्रल्हाद दराडे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून चोरीचा माल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






