चंद्रपूर एलसीबी पथकाने फरार आरोपी जेरबंद केल्यानंतरचे दृश्य

आठ वर्षे पोलिसांना चकवा; अखेर गडचिरोलीत अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 16, 2026

चंद्रपूर: फरार आरोपी जेरबंद करण्यात चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दारू तस्करीच्या गुन्ह्यात आठ वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला आरोपी गडचिरोलीतून पकडला गेला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, नागभीड पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. आरोपी तेव्हापासून फरार होता. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागभीड पोलिसांकडे सोपवण्यात आले. (चंद्रपुरात पत संस्थेवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, वाचा बातमी)

फरार आरोपी जेरबंद : गडचिरोलीतून अटक

चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण कडक दारूबंदी असताना अवैध दारू तस्करीप्रकरणी गेल्या आठ वर्षांपासून फरार असलेला एक पाहिजे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरच्या पथकाने अखेर जेरबंद केला आहे. प्रशांत ऊर्फ पिंटू शशिकांत मिस्त्री ऊर्फ मंडल (३८, रा. गडचिरोली) असे या अट्टल फरार आरोपीचे नाव असून, एलसीबीच्या धडक कारवाईमुळे तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी अखेर पोलिसांच्या हाताशी लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना नागभीड पोलीस ठाण्यात वर्ष २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागभीड पोलीस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०/१८ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) आणि ८३ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रशांत मिस्त्री हा मुख्य आरोपी असून, गुन्हा घडल्यापासून तो सातत्याने पोलिसांची नजर चुकवून भूमिगत झाला होता आणि गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या फरार आरोपीचा कसून शोध घेत होते. दरम्यान, एलसीबीच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, आरोपी प्रशांत मिस्त्री हा गडचिरोली परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीची तात्काळ खात्री करून ब्रह्मपुरी उपविभाग पथकाने सापळा रचून आरोपी प्रशांत मिस्त्री यास गडचिरोली येथून शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास नागभीड पोलीस ठाण्याच्या पथकाच्या स्वाधीन केले आहे. चंद्रपुरात दारूबंदीच्या कडक अमलबजावणीच्या काळात अवैध धंदे करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे कायद्याच्या हाताला न सापडणाऱ्या गुन्हेगारांवर एलसीबीने केलेल्या या धडक कारवाईमुळे लपून बसलेल्या इतर फरार आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment