चंद्रपूर: स्वस्तिक वृक्षलागवड मोहीम चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने एक अनोखा व स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. (जलसंधारण आणि रोजगारासाठी २८ हजार ६८८ कामांचा आराखडा, वाचा बातमी)
स्वस्तिक वृक्षलागवड मोहीम: भद्रावतीतून शुभारंभ
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी विशेष ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्षलागवड’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेचा मुख्य प्रारंभ भद्रावती तालुक्यातील सागरा व कोंडेगाव येथे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष विविध ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून स्वहस्ते वृक्षारोपण केले.
१६ औषधी वनस्पतींचे ऑक्सिजन गार्डन
या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वस्तिक आकाराच्या विशिष्ट रचनेत १६ प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे, ज्याद्वारे गावागावांत नैसर्गिक ‘ऑक्सिजन गार्डन’ साकारले जाणार आहे. केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित न राहता, या स्वस्तिक रचनेच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत भविष्यात नागरिकांसाठी लॉन, खुली व्यायामशाळा, योग केंद्र आणि वॉकिंग ट्रॅक यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. दुष्काळी काळात केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांच्या संगोपन व संरक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण मजुरांना आणि गरजू कुटुंबांना स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्ही.बी.जी.रामजी. विभागाच्या आयुक्त अनिता मेश्राम आणि सहआयुक्त डॉ. विवेक घोडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तर ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे वृक्ष क्रांती मिशन फाउंडेशनचे संस्थापक एम. एस. नाथन यांनी या मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, विविध पंचायत समित्यांचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “५० ग्रामपंचायतींत एकाच दिवशी स्वस्तिक वृक्षलागवड मोहीम”