चंद्रपूर – Chandrapur Swastik Pattern Plantation उपक्रमाचा सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात २५ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. कमी जागेत अधिक झाडे लावून पाण्याची बचत व हरित क्षेत्रवाढ साधता येईल, तसेच केशर आंबा फळबागांमधून ग्रामपंचायतींना भविष्यात स्वतःचे उत्पन्न मिळेल, असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. (चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात राजकीय गटबाजी, वाचा चंद्रपुरातील बातमी)
विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्ही -बी -जी राम-जी), ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व विविध योजनांच्या अभिसरणातून सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात 25 सप्टेंबर रोजी ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ए. एस. नाथन (ऑक्सिजन मॅन) यांच्या संकल्पनेवर आधारित ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्वस्तिक पॅटर्नच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून त्या म्हणाल्या, सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी व सरपंचांचे नियमित प्रशिक्षण होते. त्यामुळे चारही जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थींना स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि या अभिनव पद्धतीचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी या केंद्राची ‘डेमो साइट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. (महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर)
स्वस्तिक पॅटर्नमुळे कमी जागेत अधिक झाडे लावणे, झाडांना योग्य सूर्य व प्रकाश मिळणे, पाण्याची बचत व संवर्धन तसेच हरित क्षेत्र वाढविण्यास मदत होणार आहे. केशर आंबा फळबाग लागवडीमुळे ग्रामपंचायतींना भविष्यात उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतही निर्माण होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात 100 ग्रामपंचायती
या जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकानंतर पुढील महिन्यात खनिज क्षेत्र बाधित 50 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवड, तर अन्य 50 ग्रामपंचायतींमध्ये केशर आंबा लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबत पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रवाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपर्यंत उपक्रम नेण्याचे नियोजन : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग
या पथदर्शी प्रयोगानंतर जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी केशर वाणाच्या आंब्याची लागवड करण्यात येत आहे. फळबागा उत्पादनात आल्यानंतर फळांच्या विक्रीतून ग्रामपंचायतींना स्वतःचे उत्पन्न अर्थात प्राप्त होऊ शकते. या उत्पन्नाचा उपयोग गावातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, शाळा व इतर विकासकामांसाठी करता येईल. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या स्वयंपूर्णतेला चालना मिळेल. या उपक्रमांच्या माध्यमातून गावांना सुंदर, हिरवेगार आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले.
ही केवळ वृक्षलागवड नव्हे, वृक्षक्रांती’ – ए. एस. नाथन : ‘ऑक्सिजन मॅन’ ए. एस. नाथन यांनी स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले. स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण हा केवळ वृक्षलागवडीचा उपक्रम नसून विविध योजनांचे अभिसरण, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा संगम घडविणारा अभिनव प्रयोग आहे. ही केवळ वृक्षलागवड नसून ‘वृक्षक्रांती’ असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत व मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर अंतरगाव व गडमौशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, विभागीय वन अधिकारी बापू येडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, प्रभारी गटविकास अधिकारी विभावरी तितरे, लक्ष्मी कुमरे, कृषी अधिकारी महेश वट्टी, चंद्रकांत दलाल, बंडू गुंतीवार, थामदेव अगडे, प्यारेलाल देवगडे, ओम चनफने यांच्यासह प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मीनारायण दोडके यांनी आभार मानले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






