घुग्घुस रवीश सिंग विरोधात पीडित कुटुंबाची पत्रकार परिषद

“जीवाला धोका आहे, तरी तक्रार नाही”: घुग्घुस पोलिसांवर सिंग कुटुंबाचा थेट आरोप

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 26, 2026

चंद्रपूर : घुग्घुस रवीश सिंग याच्यापासून जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप आलोक सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चंद्रपुरात पत्रकार परिषदेत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न करून रवीश सिंग पसार झाल्याचे सांगितले जाते. घुग्घुस पोलीस आपली तक्रार नोंदवून घेत नसल्याचेही सिंग कुटुंबाचे म्हणणे आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतरही तक्रार दाखल झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. (कागदपत्रे हिसकावली, २ लाखांची खंडणी मागितली, गुन्हा दाखल)

घुग्घुस रवीश सिंग विरोधात कुटुंबाचे आरोप

सहायक पोलीस निरीक्षकाला वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या रवीश सिंग याच्या विरोधात आता एका पीडित कुटुंबाने दंड थोपटले आहे. घुग्घुस पोलिसांच्या अद्यापही हाती न लागलेल्या रवीश सिंग याचे कारनामे आता चव्हाट्यावर येत असून, त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप आलोक सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. विशेष म्हणजे, दहशतीखाली वावरणाऱ्या या कुटुंबाची साधी तक्रारही पोलीस प्रशासन दाखल करून घेत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

म्हातारदेवी रोड घर भाड्याच्या वादातून धमकीचा आरोप, घुग्घुस रवीश सिंग

या प्रकरणाची सुरुवात २० जून २०२५ रोजी झाली, जेव्हा आलोक सिंग यांचे वडील राजेंद्र रामरूप सिंग यांनी म्हातारदेवी रोडवरील आपले घर रवीश सिंग याचा भाऊ वैभव विनय सिंग याला १३ महिन्यांच्या रीतसर करारावर भाड्याने दिले होते. कराराची मुदत संपुष्टात आल्यानंतरही वैभव सिंग याने घर खाली केले नाही. स्वतःचे हक्काचे घर खाली करण्याची मागणी केली असता, घरमालक आलोक सिंग यांच्याशी उद्धट आणि अश्लील वर्तणूक करण्यात आली. यासंदर्भात २ ऑगस्ट रोजी आलोक सिंग हे पत्नी व मुलीसह रवीश सिंग याला भेटले असता, रवीश सिंग याने त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत, पुढच्या वेळी आल्यास जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. कुटुंबाच्या सुरक्षिततेपोटी आलोक सिंग यांनी सुरुवातीला मौन बाळगले होते आणि स्वतःचे घर असूनही ते दुसरीकडे भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर झाले.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात रवीश सिंग याने एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता, सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न करून घुग्घुस रवीश सिंग पसार झाला. अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नसून, यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे, स्वतःचा जीव धोक्यात घालून आलोक सिंग व त्यांच्या कुटुंबीयांनी २ ऑगस्टच्या घटनेची तक्रार देण्यासाठी घुग्घुस पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. अखेर २३ नोव्हेंबर रोजी सिंग कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पोलीस अधीक्षकांनी तक्रार घेण्याचे निर्देश देऊनही घुग्घुस पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.

पत्रकार परिषदेत आलोक सिंग यांनी पोलीस प्रशासनाच्या असहकार्यावर तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांच्या रेकॉर्डवर पसार असलेल्या रवीश सिंग याला आपल्या प्रत्येक हालचालीची इत्यंभूत माहिती असून, विविध लोकांमार्फत तक्रार न करण्याचा दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या संपूर्ण सिंग कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून, पोलिसांनी तात्काळ आमची तक्रार नोंदवून घेऊन आम्हाला न्याय व संरक्षण द्यावे, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे. (घुग्घुस रवीश सिंग)

रवीश सिंग याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो सध्या घुग्घुस नगरपरिषदेचा सभापती असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी आहे, तसेच ‘सुधीर मुनगंटीवार विचार मंचा’चा जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहे. पोलिसांच्या अंगावर वाहन चढविण्यासारखा गंभीर गुन्हा करूनही संबंधित राजकीय पक्ष किंवा नेत्यांनी यावर साधी दखलही घेतलेली नाही. राजकीय पदांच्या आडून दहशत माजवणाऱ्या आणि कायद्याला न जुमानणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक कधी निर्माण होणार आणि एका सामान्य कुटुंबाला न्याय कधी मिळणार, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on ““जीवाला धोका आहे, तरी तक्रार नाही”: घुग्घुस पोलिसांवर सिंग कुटुंबाचा थेट आरोप”

Leave a Comment